पुणे \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत राजीव सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे.
राजीव सातव यांनी २२ एप्रिलला ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली असता आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केले होते.
यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन जहांगीरमधील डॉक्टरांकडे राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती अशी माहिती मिळाली आहे.
राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Previous Articleभाजप नेत्या पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण
Next Article नागपूर-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस 11 मे पर्यंत रद्द








