ऑनलाईन टीम / पुणे :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना आता न्युमोनियाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार राजीव सातव यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले होते. पण अखेर ते यातून बरे झाले आणि त्यांचा करोना अहवालही निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे.
न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवले जाणार आशी चर्चा आहे. दरम्यान, राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.








