मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी विश्वजीत कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर गील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सातव यांची प्रकृती स्थिर असून गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु असंही कदम यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत विश्वजीत कदम म्हणाले की, 19 एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र 25 तारखेला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागली. सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ते यातून लवकर बाहेर येतील.
राजीव सातव यांची प्रकृती काल दुपारपर्यंत व्यवस्थित होती. परंतु अचानक तक्रारी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती डॉक्टर गील यांनी दिली. तर सातव यांची प्रकृती स्थिर आहे, गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.
राजीव सातव यांना जहांगीर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून सातव यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली.
Previous Articleहातकणंगले औद्योगिक वसाहत कंपन्यांकडून करोना नियमांचे उल्लघंन
Next Article अजेय संस्थेमार्फत अनोख्या अभयारण्य स्पर्धेचं आयोजन








