वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक 24 डिसेंबरला अहमदाबादमध्ये होणार आहे. या आगामी बैठकीत राजीव शुक्ला यांचे बीसीसीआयचे उपाध्यक्षपद कायम राहणे जवळपास निश्चित मानले जाते.
अहमदाबादमध्ये होणाऱया बीसीसीआयच्या या बैठकीमध्ये राजीव शुक्ला यांची पुढील उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी सर्व डावपेच निश्चित करण्यात आल्याची माहिती एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. 2018 साली राजीव शुक्ला यांनी आयपीएलचे चेअरमनपद भूषविले होते. तसेच ते 2017 सालापर्यंत उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते. बीसीसीआयच्या या आगामी बैठकीमध्ये ब्रिजेश पटेल यांची दुसऱयांदा आयपीएल चेअरमनपदी निवड निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अहमदाबादच्या बैठकीला बीसीसीआयच्या संलग्न असलेल्या विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांचे सदस्य उपस्थित राहणार असून त्यांना अहमदाबादमध्ये येण्यापूर्वी कोरोना चाचणी सक्तीची राहील, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले.









