गोमंतकीयांतर्फे अभिवादन
प्रतिनिधी / पणजी
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 30व्या पूण्यतिथीनिमित्त गोमंतकीयांतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त पणजीत प्रदेश काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून स्व. गांधी यांच्या देशासाठी समर्पण व त्यागाचे स्मरण केले.
माजी केंद्रीय मंत्री तथा समन्वय समिती अध्यक्ष रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री तथा आमदार लुईझीन फालेरो, सरचिटणीस ऍड. यतीश नाईक, वरिष्ठ काँग्रेस नेते रोहिदास देसाई आणि अन्य मान्यवरांची त्यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी सर्व मान्यवरांनी स्व. गांधी यांच्या तसबिरीला पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली. त्यावेळी बोलताना ऍड. खलप यांनी राजीव गांधी हे सहस्त्रकातील व्यक्तीमत्व होते असे सांगितले. अवघ्या वर्षात त्यांनी जे यश संपादन केले आणि या देशाली जी दिशा दाखविली तिला तोड नाही. त्यांनी कधीच लहान, मोठा हा भेदभाव, द्वेश, विभागणी केली नाही. आत भारतात जी तंत्रग्नज्ञानक्रांती झालेली आहे तिचे खरे जनक राजीव गांधीच होते. त्यांच्यामुळेच समाजातील सर्वात निम्नस्तरीय लोकांचेसुद्धा सशक्तीकरण झाले. या देशाचा विकास व्हायचा असेल तर भ्रष्टाचार निपटून काढावा लागेल, असे स्पष्ट शब्दात सांगणारे ते पहिले नेते होते, असेही खलप म्हणाले.
राजीव गांधी यांचा पूण्यतिथीदिन देशभरात दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. अशा या महान नेत्यास जवळून पाहण्याचे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य आपणास प्राप्त झाले, असे श्री. फालेरो यांनी सांगितले. कोकणीला राजभाषा बनावावी, त्याचबरोबर राज्याला घटकराज्याचा दर्जा मिळावा ही गोमंतकीयांची दोन मोठी स्वप्ने होती. राजीव गांधी यांच्यामुळे ती पूर्णत्वास येऊ शकली, असे सांगून प्रचंड दूरदुष्टी असलेल्या अशा नेत्यास आपण अभिवादन करतो, असे फालेरो म्हणाले. सरचिटणीस विजय पै यांनी सुत्रसंचालन केले. सचिव ऍवरसन वालिस यांनी आभार व्यक्त केले.
लसीकरण ड्राईव्ह वाहनाचे उद्घाटन
दरम्यान, राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त काँग्रेसच्या एनएसयुआय विभागातर्फे कोरोना लसीकरण ड्राईव्ह खास वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक गावात, वाडय़ावर जाऊन प्रत्येकाने लस घ्यावी यासाठी प्रचार करण्यात येणार आहे. प्रसंगी वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य गरजवंताना लसीकरण केंद्रापर्यंतसुद्धा नेण्यात येईल, त्याद्वारे राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होऊन गोवा सुरक्षित होईल याची खबरदारी घेण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह एनएसयुआयच्या अन्य पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.









