वृत्तसंस्था /वेल्लोर :
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनीने सोमवारी रात्री तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनी या सध्या वेल्लोर तुरुंगात बंद आहेत. नलिनीचे वकील ऍड. पुगलेंती यांनी याबाबत माहिती दिली. तुरुंगात नलिनी यांचे एका कैद्याशी भांडण झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नलिनीचे भांडण जिच्याशी झाले तीदेखील जन्मठेपेच्या शिक्षेत तुरूंगात बंद आहे. या भांडणाबद्दल त्या कैदीने जेलरकडे तक्रार केली, त्यानंतर नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे त्यांना वेल्लोर तुरूंगातून अन्य कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी करत आपण न्यायालयातही यासंबंधी मागणी करणार असल्याचे मुरुगनची ही मागणी न्यायालयात मांडली जाईल असे वकील पुगलेंती यांनी सांगितले. सोमवारी रात्री या प्रकारावरून नलिनीचा जेलरबरोबर वाद झाला. त्यानंतर नलिनीने गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. नलिनी 28 वर्षांपासून तुरूंगात आहे. तिच्या मुलीचा जन्मही तुरूंगातच झाला होता. यासह राजीव गांधी हत्याकांडातील अन्य सहा दोषीही तुरूंगात आहेत. यामध्ये नलिनी यांचे पती मुरुगन यांचाही समावेश आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात नलिनीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु तामिळनाडू सरकारने तिची शिक्षा 24 एप्रिल 2000 रोजी जन्मठेपेत बदलली होती.









