प्रतिनिधी/ फोंडा
राजीव गांधी कला मंदिर फोंडा आयोजित 14 व्या राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धेला काल शनिवारपासून सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल 118 पथकांनी भाग घेतला असून स्पर्धेची प्राथमिक फेरी गुरुवार 13 पर्यंत चालणार आहे. अंतिम फेरी रविवार 16 रोजी होणार असून त्याच दिवशी सायं. 4.30 वा. बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सावईवेरे येथील ज्येष्ठ लोककलाकार सौ. पिरोज नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शांताराम कोलवेकर व कलामंदिरचे कार्यक्रम अधिकारी सुनील केरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. फुगडी हा परंपरेने चालत आलेला मनोरंजनात्मक खेळ प्रकार असून महिलांना त्यातून आनंद तर मिळतोच, शिवाय शारीरिक व्यायामही त्यातून साधला जातो. पारंपारिक फुगडय़ांमध्ये त्या त्या काळातील सामाजिक घटना व प्रसंगांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. महिलांमधील भावना व स्पंदनेही त्यातून व्यक्त होतात. फुगडी सादरीकरणात जसे नाविन्य येत आहे, त्याचप्रमाणे येणाऱया काळात फुगडी लेखन स्पर्धाही सुरु होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवीन फुगडी रचनामधून आजच्या परिस्थितीवर भाष्य होईल. ज्यामुळे हा वारसा एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे प्रवाहित होताना त्यात नाविन्याबरोबरच सातत्य राहील, असेही त्यांनी नमूद केले. शांताराम कोलवेकर म्हणाले, राज्यस्तरीय स्पर्धांमुळे फुगडी सारख्या लोककला गावापुरत्या सिमित न राहता त्यांना व्यापक व्यासपीठ मिळते. फुगडीमध्ये नाविन्य येतानाच श्रोत्यांनाही दर्जेदार सादरीकरणाचे दर्शन घडते. फुगडी या प्रकारात तरुण व युवा पिढी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहे हे, सांस्कृतिक दृष्टय़ा महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
येत्या 13 ऑक्टो. पर्यंत कला मंदिरच्या मास्टर दत्ताराम सभागृहात रोज सकाळी 9.30 वा. प्राथमिक फेरी सुरु राहणार आहेत. दर दिवशी 20 पथकाचे सादरीकरण होणार असून त्यातून प्रत्येक दिवशी उत्कृष्ट अशी तीन पथके अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील. अंतिम फेरी रविवार 16 रोजी होणार असून त्याच दिवशी सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती सुनील केरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती उमर्ये यांनी केले.









