खासदार छत्रपती संभाजीराजेंनी सोलापुरात मराठा नेत्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी/सोलापूर
राजीनामा देवून आरक्षण मिळणार असेल तर उद्याच देतो. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल यासाठी समाजाचे मत जाणून घेण्यासाठी व ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी राज्याचा दौरा करत आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी सोलापुरात सांगितले.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोलापुरात शासकीय विश्रामगृहावर मराठा समाजातील नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, मराठा समाजाचे नेते माऊली पवार, दिलीप कोल्हे, किरण पवार, श्रीकांत घाडगे उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण धुडकावून लावले आहे. मराठा समाज अस्वस्थ आहे. समाजाची पुढची भूमिका जाणून घेण्यासाठी मी आजपासून राज्याच्या दौऱयावर निघाला आहे. पेंद्र किंवा राज्य सरकारच्या विरोधात माझा दौरा नाही. या दौऱयादरम्यान मी कायदे तज्ञांना मी भेटतोय, संवाद साधतोय, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, `ऍक्शन प्लॅन समाज ठरवणार आहे. त्यासाठीच मी दौरा करत आहे. या दौऱयामध्ये समाजासोबतच मी संवाद साधत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग काय काढता येईल हे मी जाणून घेत आहे.’
सरकारवर दबाव आणण्यासाठी अनेकांनी राजीनामे दिले आहेत. आपणही केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी काय करणार आहात? या प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी `खासदारकीचा राजीनामा देवून जर आरक्षण मिळत असेल तर उद्या देतो. पण मी खासदार होवून काय काय केलेय हेही पहायला हवे. दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी जयंती साजरी केली. खासदार आहे म्हणूनच रायगड प्राधिकरण होवू शकले. इतिहासात पहिल्यांदाच किल्ल्याचे संवर्धन सुरु झाले आहे.’
जे शक्य आहे ते राज्य सरकारने द्यावे
मराठा आरक्षणात कोणाची काय चूक झाली. यापेक्षा आता काय मार्ग काढता येईल याचा मी अभ्यास करत आहे. सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारने द्यायला हव्यात. माझ्यासाठी समाजाची भूमिका महत्वाची आहे. –संभाजीराजे छत्रपती , खासदार








