ऑनलाइन टीम / पुणे :
आठ पैकी तब्बल सात बक्षिसे मिळविताना रंगपंढरी संघाच्या ‘फडस’ या दिर्घांकाने राजा परांजपे प्रोडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धे’त बाजी मारली. लेखन, दिग्दर्शन, संगीत, नैपथ्य, अभिनय, प्रकाश योजना अशा सर्वच प्रकारात ‘फडस’ हा सर्वोत्तम ठरला.
राजा परांजपे प्रोडक्शनच्या वतीने पाचव्या ‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धेचे’ आयोजन भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षिस वितरण अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते करण्यात आले. राजा परांजपे प्रोडक्शनचे अर्चना राणे, अजय राणे, मंजुषा गोडसे, अश्विनी गिरी, सुबोध राजगुरू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाल्या की, नवीन संहिता असलेली नाटके आता खूप कमी झाली आहेत. त्यामुळे तुमच्या सारख्या नव्या लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. नवीन संहिता व नवीन प्रयोगांसाठी अनेक निर्माते नेहमीच तयार असतात. त्यामुळे अशा दीर्घांक स्पर्धा ही खरी संधी आहे, ज्याद्वारे स्वत:ला सिद्ध करून या क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकता.
स्पर्धेत राज्यातील २८ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यापैकी १० संघांनी अंतिम फेरीत दीर्घांक सादर केले. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण मंजुषा गोडसे व अश्विनी गिरी यांनी तर प्राथमिक फेरीचे परीक्षण अर्चना राणे व सुबोध राजगुरू यांनी केले होते.
स्पर्धेचे विजेतेपद रंगपंढरी संघाच्या ‘फडस’ या दीर्घांकाने पटकावले. द्वितीय पारितोषिक मनश्री आर्ट्स, मुंबई संघाच्या ‘गुगलीफाय’ तर तृतीय पारितोषिक वलय नाट्यसंस्था संघाच्या ‘द कट’ या दीर्घांकाला मिळाले. चैतन्य सरदेशपांडे (गुगलीफाय, मनश्री आर्ट्स, मुंबई) याला सर्वोत्तम अभिनेता तर उन्नती कांबळे (फडस, रंगपंढरी) हिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. दिग्दर्शन व लेखन यासाठी ईश्वर अंधारेला (फडस, रंगपंढरी), नैपथ्यसाठी सुनील डोंगरे व गजानन कांबळे (फडस, रंगपंढरी), संगीत व प्रकाश योजना यांसाठी अनुक्रमे हर्ष-विजय व निखील मारणे (फडस, रंगपंढरी) यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.