वार्ताहर / पुलाची शिरोली
सभासदांच्या हिताचा विचार करून अत्यंत चांगला चाललेल्या छत्रपती राजाराम साखर कारखान्यावर टिका करण्यापेक्षा स्व:ता चालवत असलेल्या डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखान्यात सहकार किती शिल्लक ठेवला आहे याचे सभासदांना उत्तर द्या.असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांना कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने यांनी केले.
ते पुलाची शिरोली येथील बिरदेव मंदीरात आयोजित सभासद मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक व माजी संचालक लक्ष्मण कदम (अण्णा) हे होते.
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, कोणतीही निवडणूक खिलाडूवृत्तीने लढवली पाहिजे. पण विरोधक अपप्रचाराचे हिम टोक गाठू पहात आहेत. तसेच शिरोली व बावडा असा अपप्रचार करुन नवा भेदभाव निर्माण करत आहेत. आम्ही कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण गावात सर्वांना समान न्याय देण्याचे काम करीत आहे.
लक्ष्मण कदम म्हणाले, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पारदर्शक कारभार करुन कारखाना अत्यंत सुस्थितीत चालवत सभासदांचे हित साधले आहे. त्यामुळे भविष्यात महाडिकांचीच सत्ता अबाधित ठेवण्यासाठी गंभीरपणे पाठीशी रहाण्याचे आवाहन केले. यावेळी राजाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, पेठवडगाव बाजार समितीचे संचालक सुरेशराव पाटील यांची भाषणे झाली. या मेळाव्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.









