निवडणुकीच्या तोंडावर महाडिक यांना दिलासा
प्रतिनिधी / कोल्हापूर
राजाराम कारखाना निवडणुकीच्या विरोधातील माजी चेअरमन विश्वास नेजदार यांनी दाखल केलेली याचिका सहकार न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. कारखान्याच्या सन 2015-2020 या मुदतीच्या झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक निकाला विरूध्द नेजदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, कारखाना तसेच विद्यमान संचालक मंडळा विरूद दावा दाखल केला होता. यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान संचालक मंडळास हा मोठा दिलासा समजला जात आहे.
या दाव्यामध्ये नेजदार यांनी त्या निवडणूकीमध्ये बोगस मतदान, महादेवराव महाडिक यांच्याबाबत थकबाकीचा मुद्दा तसेच गटवार स्वतंत्र मतपत्रिका हे मुद्दे उपस्थित करून अपिल दाखल केले होते. न्यायालयाने प्रत्येक मुद्या संदर्भात असलेल्या कायद्यातील तरतुदी, दाखल केलेले पुरावे, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेऊन सदरचे मुद्दे बेकायदेशीर असल्याचे सिध्द झाल्याने दावा फेटाळून लावला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये नेजदार यांचे निधन झाले. त्यानंतर सहकार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या दाव्यामध्ये प्रतिवादी कारखाना व संचालकांच्या वतीने ऍड. लुईस शहा व वादींच्या वतीने ऍड. पी. डी. पवार यांनी काम पाहीले.
विरोधक निश्चितपणे बोध घेतील
विरोधक राजकीय पदाचा गैरवापर करून येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देखील याच पध्दतीने कारखान्याच्या काही ऊस उत्पादक सभासदांना अपात्र ठरविणेचा प्रयत्न करीत आहेत. त्याबाबतही निश्चितपणे सभासदांना न्याय देवता न्याय देईल असा आम्हास विश्वास आहे. या निकालातून विरोधक निश्चितपणे बोध घेतील. असा विश्वास चेअरमन सर्जेराव माने, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे निकालानंतर यांनी व्यक्त केला.
विनाकारण त्रास देण्याचे कारस्थान फेल ठरले
न्याय देवता योग्यच न्याय देत असते. सभासदांनी त्या निवडणूकीत दिलेल्या निर्णयाचा स्वीकार न करता, बेकायदेशीरपणे मुद्दे उपस्थित करून निव्वळ राजकीय हेतूने कारखाना व संचालक मंडळास विनाकारण त्रास देण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. तो न्याय देवतेने फोल ठरविला आहे. – माजी आमदार महादेवराव महाडिक,ज्येष्ठ संचालक राजाराम कारखाना