पान खाऊन थुंकल्यानंतर हटकल्याच्या रागातून कृत्य
कोल्हापूर / प्रतिनिधी
पान खाउन थुंकताना हटकल्याचा राग मनात धरुन प्रसिद्ध राजाभाउ भेळचे मालक रविंद्र शिंदे यांच्यावर तरुणांनी जिवघेणा हल्ला केला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खासबाग मैदान परिसरातील राजाभाउ भेळ येथे हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. परिसरातील नागरीकांनी हल्लेखोरांना चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले. यामध्ये रविंद्र उर्फ बापू शिंदे (वय 50 रा. मंगळवार पेठ) हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री काही तरुण खासबाग येथील राजाभाऊ भेळ खाण्यासाठी आले होते. त्यातील एकाने पान खाल्ले होते. पान खालेला तरुण दुकानासमोरच थुंकला. यावेळी रवींद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. यातून चिडून त्या तरुणाने शिंदे यांच्यासोबत वाद घातला होता. मंगळवारी दुपारी संबंधित तरुण तीन साथीदारांसह राजाभाऊ भेळसमोर आला. सोमवारी रात्री झालेल्या प्रकाराचा जाब विचारत तो पुन्हा रविंद्र शिंदे यांच्या अंगावर धावून गेला. तसेच सोबत आणलेले धारदार हत्यार त्यांच्यावर उगारले. हा प्रकार पाहणारे राजाभाऊ भेळमधील काही कर्मचारी, आसपास जमलेले नागरिक धावत त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणांच्या हातातील हत्यार हिसकावून तिघांना चोप दिला. तर एक जण पसार झाला.