कुंभवडेच्या संतोष मणचेकर यांची निवड
प्रकाश नाचणेकर / राजापूर
प्रामाणिक व मेहनती अशी कोकणी माणसाची ओळख आहे. त्यामुळे कोकणातील माणूस ज्या क्षेत्रात, ज्या पदावर काम करतो, तेथे आपल्या कामाची छाप पाडतोच. संतोष बाबला मणचेकर हा मूळ राजापूर तालुक्यातील कुंभवडे-हरचिलीवाडी येथील कोकणी माणूस आपल्या प्रामाणिक आणि तत्पर सेवेमुळे राष्ट्रपती सेवा पदकाचा मानकरी ठरला आहे.
संतोष मणचेकर हे सध्या भायखळा जिल्हा कारागृहामध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनी बहाल करण्यात येणाऱया राष्ट्रपती पुरस्कारांसाठी देशातील 52 तुरूंग अधिकारी व कर्मचाऱयांना सुधारणात्मक सेवा पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त तीन तुरूंग अधिकारी व कर्मचारी असून त्यामध्ये मणचेकर यांचा समावेश आहे.
खडतर वाटचाल
राजापूर तालुक्यातील कुंभवडे-हरचिलीवाडी येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या संतोष मणचेकर यांचा जीवनप्रवास खडतर आहे. समज येण्यापूर्वीच वडिलांचे छत्र गमावलेल्या संतोष आणि त्यांच्या चार भावंडांचा सांभाळ आईने मोलमजुरी करून केला. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण कुंभवडे प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण रा. ब. ऊ. श्री. देसाई विद्यामंदिर, कुंभवडे या प्रशालेत झाले. संतोष यांचा मोठा भाऊ मुंबईला मिलमध्ये तात्पुरत्या नोकरीवर होता. त्यामुळे दहावी झाल्यानंतर संतोष यांनीही मुंबईची वाट धरली.
रत्नागिरीतूनच सेवेचा श्रीगणेशा
मुंबईला गेल्यानंतर सुरूवातीला मिळेल ते काम त्यांनी केले. त्यानंतर कारागृह विभागात भरतीसाठी अर्ज केला. त्यामध्ये त्यांची निवड होऊन 1994 मध्ये रत्नागिरी येथील विशेष कारागृहामध्ये त्यांनी नोकरीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर भायखळा जिल्हा कारागृह, जे. जे. रूग्णालय कारागृह, मुंबई मध्यवर्ती कारागृह (ऑर्थररोड जेल) अशा ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. 2013 पासून ते भायखळा कारागृहामध्ये हवालदार पदावर सेवा बजावत आहेत.
राजापूरसह जिह्यासाठी अभिमानास्पद
नोकरीत रुजू झाल्यापासून सुमारे 26 वर्षे ते प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. त्यांच्या या कामाची दखल यापूर्वीही घेण्यात आली आहे. 2017 मध्ये त्यांचा कारागृह सेवा सुधार, महाराष्ट्र महासंचालक, पुणे यांच्यातर्फे प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांना देशातील सर्वोच्च असे राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाले. कुंभवडे ग्रामस्थांसाठीच नव्हे तर समस्त राजापूरवासीयांसाठी व जिह्यासाठीही ही अभिमानाची बाब आहे.









