वार्ताहर/ राजापूर
कोरोनाचा विळखा वाढत असताना गेल्या 6 दिवसांत मुंबई, पुणेहून राजापूर तालुक्यात आलेल्या 16 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या दिडशेच्या आसपास आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाचे 5 रूग्ण आढळले असून एकाचा बळीही गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हय़ात भीतीचे वातावरण आहे. राजापूर तालुक्यात सुरूवातीपासूनच प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण सुरू असून मुंबई, पुणे तसेच अन्य जिल्हय़ातून, परदेशातून येणाऱया नागरीकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तालुक्यात आजवर सुमारे 17 हजार 363 चाकरमानी मुंबई-पुणेतून आले आहेत. यापैकी सुमारे 196 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी काहींची मुदतही संपली असून सद्यस्थितीत दिडशेच्या आसपास होम क्वारंटाईन आहेत.
अद्यापही काही चाकरमानी तालुक्यात येत असून अशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाने तालुक्यात ठिकठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. गेल्या 6 दिवसात जवळपास 16 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामध्ये राजापूर शहरातील वरचीपेठ शाळेतील 8 तर आडिवरे येथे 8 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
.









