पुसेसावळी / प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित आल्याने राजाचे कुर्लेसह गिरिजाशंकरवाडी व पुसेसावळी परिसर हादरला आहे. राजाचे कुर्ले गावात 14 दिवस पूर्ण व्यवहार ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदरचा कोरोना बाधित व्यक्ती हा मुंबई येथून दहा तारखेला राजाचे कुर्ले या गावी आपल्या कुटुंबीयांसमवेत आला. त्याला त्रास जाणवू लागल्याने पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. त्यांनतर तपासणीअंती सदर व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा निष्पन्न झाल्यांनतर गावात एकच खळबळ उडाली. खबरदारी म्हणून गावात उपाययोजना करण्यात आली. यावेळी सहवासित 10 जणांना मायणी येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर गावात 10 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने गावात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच औषध फवारणी व विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तहसिलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, वैद्यकीय अधिकारी अमित ठिगळे, डॉ.स्नेहा डांगे, सरपंच समरजित राजे भोसले, स.पो.नि.उत्तम भापकर, पोलीस पाटील छन्नुसिंग माने, ग्रामस्तरीय समिती यांनी कडक उपाय योजना करण्याचे ठरवले आहे.