सुळगा-येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये ठराव : विकासकामांच्या कृती आराखडय़ांना मंजुरी
प्रतिनिधी / येळ्ळूर
राजहंसगड किल्ल्याला लागून असलेल्या दोन कि. मी. पर्यंतच्या जमिनीतील माती खोदाईला पूर्णपणे निर्बंध घालण्याचा ठराव सुळगा-येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये करण्यात आला आहे. सरकारी असो किंवा खासगी असो कोणत्याही जमिनीमध्ये खोदाई करता येणार नाही, असे सर्वानुमते हा ठराव झाला.
सुळगा-येळ्ळूर ग्राम पंचायतीची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रारंभी ग्राम पंचायत अध्यक्षा गंगव्वा सिद्धाप्पा नाईक, उपाध्यक्ष दत्ता जोतिबा पवार, पीडीओ दुर्गाप्पा ताशिलदार, सेपेटरी पौर्णिमा जी. यांनी ग्राम पंचायत सदस्यांचे स्वागत केले. मागील बैठकीमध्ये झालेल्या ठरावांचे वाचन करण्यात आले. याचबरोबर सरकारचे जे आदेश आहेत त्याबाबतचे वाचनही करण्यात आले. नवीन जमा-खर्चाला मंजुरी देण्यात आली.
ग्राम पंचायतीच्या हद्दीतील अनेकांनी विविध कामांसाठी अर्ज केले होते. त्या अर्जांचा विचारविनिमय करण्यात आला. याचबरोबर महात्मा गांधी ग्रामीण उद्योग खात्री योजनेंतर्गत चर्चा करून कृती आराखडय़ाला मंजुरी मिळाली आहे. त्याबाबतही चर्चा करण्यात आली. कचरा विल्हेवाट करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्राम पंचायत सदस्य अरविंद वसंत पाटील, जयदेव जोतिबा कुकडोळकर, जोतिबा सहदेव थोरात, हणुमंत रायाप्पा बोरक, सुमित्रा श्रीकांत तावशे, रेणुका महार यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित
होते.
अमित कुकडोळकर यांनी आभार मानले. कोरोनाचे नियम पाळत ही सभा पार पडली.









