कडोलीची बैलजोडी द्वितीय : अगसगे येथील बैलगाडी शर्यतीची सांगता
वार्ताहर /अगसगे
अगसगे ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी आयोजित केलेल्या रिकामी बैलगाडी पळविण्याच्या जंगी शर्यतीत राजहंसगडच्या राम-लक्ष्मण या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. 2 फेब्रुवारीपासून या शर्यतीला प्रारंभ झाला असून शनिवार दि. 5 रोजी शर्यतीची सांगता झाली.
राजहंसगडच्या राम-लक्ष्मण या बैलजोडीने 1953 फूट 10 इंच अंतर पार करून एक लाख एक रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले आणि कलमेश्वर प्रसन्न कडोली यांच्या बैलजोडीने 1926 फूट 2 इंच अंतर पार करून 75 हजार रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. नारायण लक्ष्मण कार्वेकर, मोदेकोप्प यांच्या बैलजोडीने 1918 फूट 10 इंच रिकामी बैलगाडी पळवून तिसऱया क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. अशी एकूण वीस बक्षिसे होती.
ग्राम पंचायत कार्यालयासमोर रविवार दि. 6 रोजी बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी विजेत्या बैलजोडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य, अप्पय्यगौडा पाटील, अमृत मुद्देन्नवर, भैरू कंग्राळकर, गुंडू कुरेन्नवर, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, शर्यत कमिटीचे सदस्य व श्रीराम सेना हिंदुस्थानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
शर्यत व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंद्रकांत सनदी यांनी केले. निर्वानी कुरबेट यांनी आभार मानले.









