पुणे / वृत्तसंस्था
एकापेक्षा एक मॅचविनर्सचा समावेश असलेल्या हेवीवेट्स राजस्थान रॉयल्स संघाची आज (मंगळवार दि. 29) आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सलामी लढत होत असून दोन्ही संघ अर्थातच विजयी सलामी देण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरतील. दिवसभरातील या एकमेव लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
राजस्थान रॉयल्सचे फलंदाजीतील भवितव्य बऱयाच अंशी त्यांचा कर्णधार संजू सॅमसनच्या फॉर्मवर अवलंबून असेल. सॅमसन अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, अद्याप तो या प्रँचायझीच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. सॅमसनच्या कामगिरीत सातत्य नाही, ही मुख्य चिंता असून त्याने यावर मात केल्यास ही बाब राजस्थानच्या पथ्यावर पडू शकेल. उद्घाटनाची आयपीएल जिंकल्यानंतर राजस्थानच्या पदरी जेतेपदाच्या निकषावर सातत्याने अपयशच पदरी आले असून हा दुष्काळ यंदा तरी संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सॅमसनने येथे अव्वल कामगिरी साकारली तर त्याचा ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपसाठीही विचार होऊ शकतो.
जयपूरस्थित राजस्थानचा संघ जोस बटलर व देवदत्त पडिक्कल यांना सलामीला उतरवणे अपेक्षित असून जागतिक स्तरावरील कोणत्याही गोलंदाजी लाईनअपचा फडशा पाडण्याची या उभयतांची क्षमता निर्णायक ठरु शकते. सलामी जोडीने फ्लाईंग स्टार्ट दिल्यानंतर त्याला समयोचित साथ देण्यासाठी सॅमसन व अन्य सहकारी सज्ज असतील. रॉयल्सकडे शिमरॉन हेतमेयर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, जिम्मी नीशम, रियान पराग यांच्यासारखे पॉवर हिटर्स मधल्या फळीत उपलब्ध आहेत.
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहलसारखे अव्वल दर्जाचे फिरकीपटू समाविष्ट केले असल्याने या संघाची गोलंदाजी देखील भरभक्कम झाली आहे. या उभयतांची 8 षटके विशेष महत्त्वाची ठरतील. जलद गोलंदाजीच्या आघाडीवर ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा व नवदीप सैनी हे दिग्गज खेळाडू या संघात समाविष्ट आहेत.
हैदराबादसाठी विल्यम्सनचे योगदान महत्त्वाचे
सनरायजर्स हैदराबाद संघासाठी कर्णधार केन विल्यम्सनचे योगदान यंदा विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. विल्यम्सनचा सहकारी ग्लेन फिलीप्स हा हार्डहिटिंग विंडीज ओपनर निकोलस पूरनच्या साथीने सलामीला उतरण्याची शक्यता चर्चेत असून प्रियम गर्ग व राहुल त्रिपाठी यांच्यावर प्रामुख्याने मध्यफळीची जबाबदारी असेल. विल्यम्सनने तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला तर रविकुमार समर्थचा पर्याय सलामीसाठी त्यांच्याकडे उपलब्ध असेल. अब्दुल समद फिनिशर या नात्याने उत्तम योगदान देऊ शकतो.
या संघाची गोलंदाजीची भिस्त डेथ बॉलिंग स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमारवर असेल. मात्र, त्याच्यासह नवा सेन्सेशनल पेसर उमरान मलिकने सातत्यपूर्ण योगदान दिले तरच हा संघ प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणू शकेल. डावखुरा जलद गोलंदाज टी. नटराजन ताज्या दमाने पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला असून भेदक यॉर्करवरील हुकूमत नव्याने अधोरेखित केली तर या दिग्गज गोलंदाजाला भारतीय संघात परतण्याची संधी मिळू शकते. आणखी एक टी-20 स्पेशालिस्ट वॉशिंग्टन सुंदर सनरायजर्ससाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. अन्य खेळाडूत श्रेयस गोपाल किंवा जे. सुचिथचे पर्याय आजमावून पाहिले जाऊ शकतात.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, शुभम गरवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बरोका, अनुनय सिंग, केसी करिअप्पा, जोस बटलर, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, नॅथन काऊल्टर नाईल, जिम्मी नीशम, डॅरेल मिशेल, करुण नायर, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचिथ, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.









