60 रेल्वेगाडय़ांचे मार्ग बदलले : 220 बसेस थांबविल्या : राज्य सरकारकडून वेगाने हालचाली, चर्चेस प्रारंभ
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात अतिमागास वर्गाच्या (एमबीसी) बॅकलॉगच्या भरतीसह अन्य मागण्यांसाठी गुर्जरांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. भरतपूरच्या बयाना येथे कर्नल किरोडी सिंग बैंसला गटाचे लोक पीलूपुरा नजीक रेल्वेमार्गावर धरणे आंदोलन करत आहेत. गुर्जरांनी रात्रभर रेल्वेमार्गावर ठाण मांडले असून सोमवारीही आंदोलन सुरूच आहे. याचदरम्यान सर्व मागण्या पूर्ण होईंपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे बैंसला यांनी म्हटले आहे. आंदोलक पीलूपुरीनजीक दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर ठाण मांडून आहेत. तसेच बयाना-हिंडौन मार्गावरील वाहतूक रोखली आहे. तर राज्य सरकारने खबरदारीदाखल 5 जिल्हय़ांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
आंदोलकांनी दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गाचे नुकसान केल्याने रविवारी 40 मालगाडय़ांसह 60 रेल्वेगाडय़ांचा मार्ग बदलावा लागला आहे. दिल्ली-मुंबईदरम्यान धावणाऱया रेल्वेंचे मार्ग बदलावे लागले आहेत. तर 4 रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या आहेत. दौसा, करौली, भरतपूर आणि बयानानजीक सुमारे 220 बसेस रोखण्यात आल्या आहेत. याचमुळे सणासुदीच्या काळात जनतेला त्रास होऊ लागला आहे. भरतपूर, करौली, दौसा, सवाईमाधोपूर आणि जयपूर जिल्हय़ातील अनेक तालुक्यांमध्ये इंटरनेट बंद आहे.
सरकारकडून तडजोडीचा प्रयत्न
सरकारच्या वतीने क्रीडामंत्री अशोक चांदना हे बैंसला यांच्याशी चर्चेसाठी गेले होते, परंतु त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले आहे. आंदोलनाच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलो होतो, परंतु केंडीमुळे पुढे जाऊ शकलेलो नाही. तरीही बैंसला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृती बरी नसल्याचे कारण देत मुलगा विजय यांच्याशी चर्चा करण्या सांगितले आहे. त्यांना फोन केला असता थोडय़ा वेळाने बोलतो, असे सांगितल्याची माहिती चांदना यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांवर पुन्हा विश्वास ठेवावा
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा फोन आला होता, त्यांनी विस्तृत चर्चा करण्यासह गुर्जर समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याचमुळे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा असे कर्नल किरोडी सिंग बैंसला यांनी म्हटले आहे.









