सचिन पायलटांकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत लक्ष्य
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानात मागील वर्षी सचिन पायलट गटाच्या बंडानंतर काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय तडजोड समितीचा अहवाल अद्याप समोर न आल्याने काँग्रेसमध्ये पुन्हा विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी देण्यात आलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. 10 महिने होऊनही आश्वासनांवर कुठलेच पाऊल उचलण्यात आले नसल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.
समिती वेगाने कृती करणार असे मला सांगण्यात आले होते. पण निम्मा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही मुद्दे अद्याप निकालात निघालेले नाहीत. पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी दिवसरात्र मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांकडेच दुर्लक्ष होणे दुर्दैवी असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, त्यांच्या आदेशावरच समिती स्थापन करण्यात आली होती. समितीत सध्या दोन सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पायलट यांच्या नव्या विधानामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा तापले आहे. पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी यांनी मतदारसंघातील विकासकामांकडे दुर्लक्षाच्या मुद्दय़ावरून 18 मे रोजी राजीनामा दिला होता. तर दोन दिवसांपूर्वी पायलट गटातील पी. आर. मीणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अर्थसंकल्पाचे तीन महिन्यांनी कौतुक केले आहे. मीणा यांचे हे विधान मुख्यमंत्री गटाकडून प्रसारित करविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पायलट गटाचा संयम तुटतोय
मागील वर्षी पायलट गटाच्या उघड विरोधानंतर 11 ऑगस्ट रोजी काँग्रेसने के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल आणि अजय माकन यांची एक समिती स्थापन केली होती. या तडजोड समितीकडे पायलट आणि त्यांच्या समर्थकांच्या मागण्या ऐकून घेत त्या आधारावर पक्षश्रेष्ठीला अहवाल देण्याची जबाबदारी होती. समितीचे एक सदस्य अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. या समितीच्या स्थापनेला 10 महिने उलटून गेले असले तरीही त्याच्या अहवालाचा पत्ता नाही. मागण्यांवर कुठलीच कृती न झाल्याने पायलट गटाचा संयम तुटू लागला आहे.









