ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यात ‘इंदिरा रसोई योजना’ सुरू केली. यामुळे राज्यात आता केवळ 8 रुपयांमध्ये भोजन थाळी मिळणार आहे. या योजनेसाठी अंदाजे एक वर्षाला 100 कोटी रुपये खर्च येईल.

या योजनेची सुरुवात माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी म्हणजेच गुरुवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आली. यावेळी गेहलोत म्हणाले, इंदिरा रसोई योजना प्रदेशातील विशेष योजना आहे. या योजनेत शहरातील गरीब कुटुंबांना पौष्टिक भोजन स्वस्त दरात दिले जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, राज्यातील कोणताही नागरिक उपाशी राहू नये तसेच राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे.
स्वयक्त शासन मंत्री शांती धारीवाल यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केवळ 8 रुपयांमध्ये पौष्टिक आणि शुध्द भोजन उपलब्ध होणार आहे. एका थाळी साठी एकूण 20 रुपये खर्च होणार आहे. यातील 12 रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. तसेच राज्यातील 213 नगरातील 358 भागांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.









