प्रतिनिधी/सातारा :
अनलॉकचा टप्पा 4 था सुरु झाला आहे. सातारा शहरात कोरोनाचे रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. रुग्ण वाढत असताना दुसऱया बाजूला शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन बेशिस्तीचे दर्शन घडताना दिसत आहे. युनियन भाजी मंडई असताना देखील राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर भाजी मंडई भरल्याचे दिसत आहे. श्री.छ.प्रतापसिंह हायस्कूलसमोर व चाँदणी चौकात फळांचे हातगाडे लागलेले दिसत आहेत. राजवाडा बसस्थानकात नव्याने टपरीचे काम सुरु आहे. कोरोना वाढवण्याला जबाबदार कोण?, असा सवाल सातारकर विचारु लागले आहेत.
सध्या शहराच्या पश्चिम भागात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहेत. मंगळवार तळे रोडवर बसणाऱया अनाधिकृतपणे किरकोळ भाजी विक्रेत्यांमुळे बेशिस्तीचे दर्शन वारंवार घडते आहे. अनलॉक सुरु असले तरीही अजूनही नियम पाळणे गरजेचे आहे. त्याच नियमांची पायमल्ली येथे होताना दिसत आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाची वारी सध्या कोरोनाच्या कामकाजात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना रस्त्यावर बसलेल्या या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास वेळ नाही. तर राजवाडा परिसरात चाँदणी चौकात अनेक फळांचे गाडे लागलेले आहेत. श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलसमोर फळांचे गाडे लागलेले आहेत. त्यामुळे अनलॉक होत असताना नियमांचे उल्लघंन होताना दिसत आहे.
राजवाडा बसस्थानकाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असतानाच उसाचे गुराळ झाले.त्यानंतर पोलीस चौकीबाबत नगरसेवक विजय काटवटे हे प्रयत्नशील असले तरीही तेथे पोलीस चौकी होवू नये अनेकांचे अपघात होण्याची भिती व्यक्त करत नगरसेवक अविनाश कदम यांनी विरोधात तक्रार केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. तर तेथे लवकर पोलीस चौकी सुरु करावी अशी मागणीही दुसऱया बाजूने होत आहे. असे असतानाच आतमध्ये नव्याने आणखी एक टपरी टाकण्याचे काम सुरु आहे.
सातारा पालिकेकडून कारवाई शुन्य
पालिकेचे पदाधिकारी झोपलेले आहेत. त्यांना दिसत नाही कुठे शहरात काय चालले आहे ते. आम्ही तक्रारी करुनही त्यांना जाग येत नाही. लोकांना कोरोना होण्याचे अनाधिकृत मंडई आहेच पण राजवाडा बसस्थानकात कोणाच्या कृपेने टपरी टाकण्याचे काम सुरु आहे. ते पहिले थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी केली आहे.









