प्रतिनिधी/ सातारा
राजवाडा बसस्थानकाच्या कोपऱयात नगरसेवक विजय काटवटे यांच्या प्रयत्नाने पोलीस चौकीचे काम झाले आहे. ही चौकी सुरु होण्याआधीच वादात सापडली आहे. त्या चौकीच्या शेडवर नगरसेवक अविनाश कदम यांनी लेखी तक्रार केली आहे, त्यानुसार सातारा पालिकेने एसटी महामंडळालाच दोन दिवसांत ते शेड काढून घेण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, त्या चौकीला दिलेल्या नावावरही ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजवाडा बसस्थानकात नुकतीच नगरसेवक विजय काटवटे आणि यंग जायंट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस चौकीचे काम पूर्ण झाले आहे. ही चौकी अजूनही सुरु झाली नाही. तत्पूर्वी सातारा पालिकेकडे नगरसेवक अविनाश कदम यांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार केली होती. त्या तक्रारीची पालिकेने दखल घेवून थेट एसटी महामंडळालाच लेखी पत्र पाठवले आहे. त्या पत्रानुसार दोन दिवसांत ते पत्र्याचे शेड काढण्यात यावे, अन्यथा पालिका ते शेड काढेल आणि आपणाकडून होणारा खर्च वसूल करेल, असा इशारा दिला गेला आहे. तसेच काटवटे यांनी नुकतेच नामकरण केले असून त्यावर पश्चिम भागातील नागरिकांनीही आक्षेप घेतला आहे, त्यामुळे चौकी सध्या वादाच्या भोवऱयात सापडली आहे.::
चुकीच्या पद्धतीने टाकले शेड
मंगळवार तळय़ाकडून येताना डाव्या बाजूला वाहने दिसत नाहीत. अपघात होण्याची शक्यताही असते. हे काम नियमबाह्य असून तक्रार केली आहे. ते शेड नागरिकांच्या हितासाठी काढणारच.::
नगरसेवक अविनाश कदम
सर्व काही नियमानुसार केले आहे
समाजाच्या हितासाठी चौकी काम पूर्ण केली आहे. तिथे मुलींची छेडछाड होते. चोऱया होत होत्या, भांडण होत होती. त्यास आळा बसावा म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार चौकी केली आहे. तसेच चौकीला नाव देण्याची ही पहिलीच वेळ नाही. नावे इतरही चौकींना दिलेली आहेत. सर्व काही परवानगी घेवून केले आहे.::
नगरसेवक विजय काटवटे
नाव देण्याचे कारण काय?
पोलीस चौकीवर कै. सौ. अनुसया काटवटे असे नाव दिले आहे. पोलीस चौकीला नाव देण्याची तरतूद आहे का?, चौकाचौकात चौक्या उभ्या राहतील अन् नावे दिली जातील. त्यांचे कशाकरता नाव द्यायचे. एकीकडे पी. जी. पाटील, यु. मा. पठाण, रावबहादूर काळे, देवधर, आमचे तीन कोल्हटकर यांच्यासह खूप नाव सांगता येतील. मात्र, त्यांचे नाव देण्याचे कारण काय?::
संजय कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक
स्टॅण्डच्या आवारात आहे
काय ह्याचं मला गणित कळेना. लोकांचे काम होतेय. ह्या नगरसेवकांचे फोटो छापायचे का?, तिथे चौकीची गरज आहे. कॉनर्र का निवडला तर रस्त्यावर वॉच रहावा हा हेतू. एसटीच्या आवारात असून नगरपालिकेची हद्द आहे व्हय. अडथळा आहेच कुठे? ती काय रस्त्यावर बांधली व्हय पालिकेच्या. जायंट्स ग्रुपने बांधली आहे.::
अमोल सणस जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी









