प्रतिनिधी/ सातारा
राजवाडा बसस्थानकाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या शिल्पसृष्टीच्या माध्यमातून इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे शिल्प शासकीय निधीतून उभारण्यास परवानगी देणाऱया अधिकाऱयांची खातेनिहाय चौकशी करावी तसेच ही शिल्पे हटवून त्याठिकाणी राजमाता जिजाऊ आणि छ. शिवरायांचे शिल्प उभारण्यात यावे अशी मागणी सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीतर्फे बांधकाम विभागातील अधिकाऱयांना रीतसर निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शासकीय खर्चातून सातार्यातील राजवाडा बसस्थानकाचे सुशोभीकरण व दुरुस्ती करण्यात येत आहे. या ठिकाणी एक शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे. त्यात श्री संत तुकाराम महाराज तसेच संत रामदास स्वामी आसनावर बसून छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश करत असलेल्या शिल्पाचा समावेश आहे.
वास्तविक, या दोन्ही शिल्पांबाबतचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे कोणत्याही दप्तरी नाहीत, तरीही काल्पनिकतेच्या आधारे ही शिल्पे साकारण्यात आली आहेत. या माध्यमातून खोटा इतिहास उभा करत सनातनी प्रवृत्ती आपला अजेंडा पुढे रेटत असल्याचे म्हटले आहे. यावेळी चंद्रकांत खंडाईत, बाळकृष्ण देसाई, गणेश भिसे, श्रीरंग वाघमारे, गणेश कारंडे आदी उपस्थित होते.