प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजात खदखद असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजातील युवक-युवतींमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या सर्व गंभीर गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा संघटनांच्या वतीने गुरूवारी (3 जून) सकाळी राजर्षी शाहू महाराजांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. 90 मिनिटे आंदोलन चालणार आहे.
या आत्मक्लेश आंदोलनात अ. भा. छावा संघटना, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा आरक्षण् संघर्ष समिती, मराठा समाज संघटना, लोकराजा राजर्षी शाहू प्रतिष्ठान, मराठा समाज सेवा संघटना, मराठा विद्यार्थी संघटना, मराठा रियासत आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या तयारीसाठी राजमाता जिजाऊ ब्रिगेडचे संस्थापक चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. यामध्ये पै. बाबा महाडिक, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे, संपत चव्हाण-पाटील, जयदीप शेळके, राजू भोसले, सुनीता चंद्रकांत पाटील आदी सहभागी झाले. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संभाजीराजेंच्या पाठिशी खंबीरपणे राहणार
मराठा आरक्षणाच्या लढय़ात खासदार संभाजीराजे यांच्या पाठिशी खंबीरपणे राहण्याचा निर्धार आत्मक्लेश आंदोलनाच्या तयारी बैठकीत सर्व मराठा संघटनांच्या पदाधिकाऱयांनी केला.
आपसातील वैचारिक मतभेद दूर ठेवून मराठा आरक्षणाचा लढा प्रामाणिकपणे लढुया, युवा पिढीला न्याय मिळवून देवुया हा संदेश आत्मक्लेश आंदोलनातून देत सरकारचेही लक्ष वेधण्यात येणार आहे.
-पै. बाबा महाडिक, संस्थापक, अध्यक्ष, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान