- तमाम करवीरवासियांची संतप्त भावना
- तथाकथित शाहूवाद्यांचे चेहरेही उघड
संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूरचे भाग्यविधाते, बहुजन उद्धारक, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सध्या सुरू असलेल्या राजकारणावरुन तमाम करवीरवासियांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. ज्या लोकराजाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वासात गोरगरीब, सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार केला. दूरदृष्टीतून कृतीशिल निर्णय घेतले, त्यांच्या नावाने गेली पाच दिवस सुरू असलेल्या घटना गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया शाहू विचारांच्या अनुयायातून व्यक्त होत आहेत.
26 जून रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती होती. कोरोनाच्या काळातही करवीरवासियांसह राज्य आणि देशात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. 1897-98 च्या काळात कोल्हापूर संस्थानात आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळी महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक आपत्ती व्यवस्थापनाची अर्थात ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ची चर्चा झाली. कोरोनाच्या काळात शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेत कोरोनायोद्धे लढत आहेत. एकीकडे जयंतीच्या निमित्ताने शाहूंच्या विचाराचा जागर, मंथन सुरू असताना एक घटना घडली आणि त्यातून राजकारण सुरू झाले.
जयंतीदिनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आदिल फरास आणि त्यांच्याबरोबर अभिवादन करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी पादत्राणे काढली नसल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. घडला प्रकार अनावधानाने झाला असला तरी शाहूंच्या विचारावर प्रेम करणाऱया असंख्य शाहूप्रेमींना दुखावणारा होता. प्रकाराचे गांभीर्य ओळखून फरास यांनी तत्काळ जाहीर माफी मागितली. आपण आणि घराणे शाहूंच्या विचारानेच आजवर समाजसेवा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट करून चूक झाल्याचे मान्यही केले. त्यानंतर त्यांनी शाहू समाधीस्थळावर आत्मक्लेश केला.
फरास यांची माफी आणि आत्मक्लेशानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले. कोल्हापूर भाजपने फरास यांचा निषेध करत ते तथाकथित पुरोगामी असल्याची टीका करत आत्मक्लेश म्हणजे थोतांड असल्याचे म्हटले. भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फरास यांनी ज्या ठिकाणी आत्मक्लेश केला. ते शाहू समाधीस्थळ अशुद्ध झाले, असे सांगत त्या ठिकाणी पंचगंगेचे पाणी आणि गोमूत्र शिंपडून शुद्धीकरणाचे आंदोलन केले.
हा शाहूंच्या पुरोगामी विचाराचा पराभव होता. तोही त्यांच्याच समाधीस्थळावर झाला. पुरोगामी भाटांची तोंड का बंद? असा सवाल करत भाजपने शाहूप्रेम व्यक्त केले. (विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू पुण्यतिथी दिनी संदेशात शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता. त्यावेळी भाजपने मौन पाळले होते, तर राष्ट्रवादीसह पुरोगामी संघटनांनी फडणवीसांवर टीका केली होती.) फरास यांच्याकडून प्रकार घडल्यानंतर भाजपने भूमिका घेण्याआधी मात्र शहरातील पुरोगामी संघटना, कार्यकर्ते शांत होते. त्यांनी किमान निषेध करणे अपेक्षित होते. पण तसे घडल्याचे दिसत नाही. सोशल मीडियावर मात्र शाहूंच्या अनुयायांनी निषेध केला. पण एरव्ही शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय ज्यांचा दिवस सुरू होत नाही, अशा डाव्या, पुरोगामी चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांनी पाळलेले मौन कशाचे द्योतक होते हे तेच जाणो. पण भाजपने टीका, आंदोलन केल्यानंतर काही नवपुरोगामी जागे झाले. राजर्षी शाहू सेनेचे शुभम शिरहट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या गोमुत्र शिंपडण्याच्या प्रकाराचा निषेध करत संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली. ऋषिकेश पाटील, अभिषेक मिठारी, दीपक दळवी आणि सरदार पाटील या पुरोगामी कार्यकर्त्यांनी शाहू समाधीस्थळाची गोमूत्र शिंपडल्याने विटंबना झाल्याचा आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या सर्व घटनाक्रमातील प्रत्येक जण आपले राजकीय आणि सामाजिक मायलेज वाढविण्याचा प्रयत्न करत होता. फरासांकडून अनावधनाने घडलेला प्रकार चूक होती. माफी मागितल्यानंतर त्यांनी केलेला आत्मक्लेशही विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांची आठवण करून देणारा ठरला. फडणवीसांच्या विधानावर चूप बसणाऱया भाजपचे अचानक शाहूप्रेम जागे होणे निश्चितच योगायोग नव्हता. शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाचा जागर करणाऱया काही कथित पुरोगाम्यांनी नेहमीप्रमाणे मौनाची सोयीची भूमिका घेतली. शाहू महाराज हे कोल्हापूरवासियांचा श्वास आहेत. त्यांचा विचार सहन होत नसेल तर किमान बुद्धीभेद करू नका, राजकारण करू नका, अशी अपेक्षा सर्वसामान्य शाहूप्रेमी व्यक्त करत आहेत. घडल्या प्रकारातून तथाकथित राजकीय शाहूवादी, तथाकथित शाहूप्रेमी आणि पुरोगाम्यातील तथाकथित शाहूवादी कोण? हे करवीरवासियांना समजून चुकले आहे.
*सव्वा लाख अध्यादेशावर स्वाक्षरी*
राजर्षी शाहू महाराजांनी 48 वर्षांच्या आयुष्यात 28 वर्षे राज्यकारभार सांभाळला. या काळात त्यांनी हजारो निर्णय घेतले. सक्तीचे शिक्षण, आरक्षण, बालहक्क आदी जनहिताचे कायदे केले. शेती, कला, क्रीडा, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कृतीशिल योजना राबविल्या. जनहिताच्या तब्बल सव्वा लाखांहून अधिक अध्यादेशांवर महाराजांनी स्वाक्षरी केली. आजच्या काळातही त्यांचे विचार आणि कार्यच देशाला पुढे नेणारे आणि अनुकरणीय आहे.