प्रतिनिधी / कोल्हापूर
संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संवैधानिक मूल्यांची आपल्या संस्थानात रुजवात करणारे शाहू महाराज एकमेव पूर्वसुरी होते. संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन त्यांनीच दिले. मूलभूत अधिकार, निर्देशित तत्त्वे त्यांनी आपल्या संस्थानात रूजवली. शाहू महाराज म्हणजे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर (खंड-12)' आणिशाहू छत्रपती: राजा आणि क्रांतीकारक (खंड-13)’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळयात ते बालेत होते. विद्यापीठाच्या छत्रपती शाहू स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत अनुक्रमे मद्रास विद्यापीठाचे डॉ. चंद्रा मुदलियार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एन. वैद्य यांनी दिलेल्या व्याख्यानांचा प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांनी अनुवाद केला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
डॉ. देशमुख म्हणाले, महापुरूषांचे मोठ्या प्रमाणात विभूतीकरण वा दैवतीकरण सुरू आहे. वैचारिक प्रतिरोध आवश्यक असला तरी टोकाच्या गोष्टी सामाजिक सौहार्दासाठी धोकादायक असतात. न्या. वैद्यांनी शाहू महाराजांचे चरित्र रंजकपणे, नेमकेपणाने व नेटकेपणाने सांगितले आहे. चंद्रा मुदलियार यांनी कोल्हापुरातील ब्राह्मणेतर चळवळीचा साद्यंत वेध घेताना `कोल्हापूर चळवळी’चे वेगळेपण सिद्ध करते.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक सुधारणांची चळवळ आरंभली. त्यावेळी ब्राह्मणांना आपल्या प्रतिष्ठेला बाधा आल्यासारखे वाटले. वेदोक्त प्रकरणामुळे या भावनेला टोकाचे स्वरुप येऊन ब्राह्मणेतर चळवळ अधिक गतिमान झाली. पुढे तिने अखिल वंचितांच्या चळवळीचे स्वरुप धारण केले.
अनुवादक प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांचा व डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रा. पंगू यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सचिन घोरपडे यांनी संयोजन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.
Previous Article‘सतेज पाटील यांनी महापालिकेला 15 कोटीला बुडवले’
Next Article सातारा : गुंड गजा मारणेला मेढय़ात अटक









