पेठ वडगाव / प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला. गुलामगिरीसारखी अमानवी प्रथा मोडीत काढून समतेचा संदेश दिला. देशाला शाहू महाराजांनी प्रगतीचा, समतेचा विचार दिला अशा दूरदृष्टी लाभलेल्या लोकराजाला केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी पेठ वडगाव येथे एक लाख सह्यांची मोहीम सुरु असून या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
यावेळी बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले, राजर्षी शाहू राजांनी सर्व जातीधर्मांतील मुलामुलींना शिक्षण मिळावे, यासाठी कोल्हापुरात ११ बोर्डिंग सुरू केली. समतेचे तत्त्व अंगीकारत असताना शाहू महाराजांनी सरकारी नोकरीत आरक्षण सुरू केले. देशातील पहिले आरक्षणाचे धोरण कोल्हापूर संस्थानात राबवण्यात आले होते. विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली व देवदासी प्रथा रोखण्यासाठी कठोर कायदाही बनवला. अस्पृश्यता निवारणासाठी महाराजांनी कृतिशील आदर्श घालून दिला.
सामाजिक प्रगतीबरोबरच शेती व औद्योगिक प्रगतीसाठीही शाहू महाराजांनी मोठे काम केल्याचे सांगत माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘केवळ शाहू महाराजांच्या प्रयत्नामुळेच कोल्हापुरात रेल्वे आली. राधानगरी धरण बांधून कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ उभारली. शेती, उद्योग, सहकार क्षेत्राला चालना दिली. अनेक कलाकार, खेळाडूंना राजाश्रय दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी मदत केली.
देशाला शाहू महाराजांनी प्रगतीचा, समतेचा विचार दिला असून दूरदृष्टी लाभलेल्या लोकराजाला केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी पंतप्रधानांना सादर करण्यासाठीचे एक लाख सह्यांचे निवेदन मोहीम वडगाव शहरात पत्रकार संतोष सणगर व सहकारी पत्रकार बांधवानी सुरु केली आहे. यावेळी पत्रकार संतोष सणगर यांचा कोरोना योद्धा व उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी खासदार शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री शिवाजीराजे व्यापारी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन संजय कदम यांचेसह पत्रकार उपस्थित होते.