प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 पासून 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 पर्यंत जमावबंदी जारी राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी मतदान सुरू होण्यापूर्वीचे 48 तास आणि मतदानानंतर 24 तास राजराजेश्वरीनगर मतदारसंघात गटागटाने वावरू नये, असा आदेश बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांना दिला आहे.
राजराजेश्वरीनगरनगर मतदारसंघात एकूण 4 लाख 62 हजार 236 मतदार असून 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 3,957 निवडणूक कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कोरोनाबाधित मतदारांनाही मतदानाचा अधिकार
राजराजेश्वरीनगरनगर मतदारसंघात 9 वार्डांचा समावेश आहे. 3 नोव्हेंबर रोजी येथे मतदान होणार आहे. मागील 17 दिवसांमध्ये येथे 1,177 कोरोना रुग्णांचा शोध घेतला असून त्यांना देखील मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, मतदान करण्यास इच्छुक असल्याची माहिती आधी द्यावी लागणार आहे. कंट्रोल रुमला फोन केल्यानंतर आरोग्य कर्मचारी रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रापर्यंत नेऊन पुन्हा घरी सोडण्यात येणार आहे. त्यांना पीपीई किटचे देखील वितरण केले जाईल. एकूण 90 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदारांना हातमोजे देणार
राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवेळी मतदारांना उजव्या हातात परिधान करण्यासाठी हातमोजे देण्यात येतील, अशी माहिती बेंगळूर शहर जिल्हा निवडणूक अधिकारी मंजुनाथ प्रसाद यांनी दिली. मतदान केंद्रांमध्ये महिला, पुरुष आणि दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱयाची नेमणूक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.









