पॅसिनो-पर्यटक वाहनांचे खुलेआम पार्किंग
प्रतिनिधी/ पणजी
झोपाळू वाहतूक पोलीस आणि सुस्तावलेले वाहतूक खाते यांच्यामुळे राजधानीत सध्या वाहतूक व्यवस्थेतील मनमानीपणा शिगेला पोहाचला आहे. कॅसिनो वाहने आणि पर्यटक टॅक्सींच्या बेकायदेशीर पार्किंगला मर्यादाच राहिलेली नाही, असे चित्र दिसून येत आहे.
या प्रकाराविरोधात आता सामाजिक कार्यकर्ते ऍड. आयरीश रॉड्रिगीश यांनी सरकारचे लक्ष वेधले असून पणजीतील संपूर्ण वाहतूक गोंधळावर सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
बांदोडकर मार्ग बनला ’पार्किंग-स्टॉपिंग’ झोन
त्यासंदर्भात त्यांनी मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे. राजधानीतील दयानंद बांदोडकर मार्ग हा ’नो पार्किंग-नो स्टॉपिंग’ झोन आहे. तरीही अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर पॅसिनो वाहने 24 तास उभी करून ठेवण्यात येत आहेत. तरीही या बेकायदेशीर प्रकाराकडे वाहतूक पोलीस आणि वाहतूक खात्याचे अधिकारी सोयीस्करपणे कानाडोळा करत असल्याचे रॉड्रिग्स यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरभर बेकायदेशीर टॅक्सी पार्किंग
या बेकायदेशीरपणातील अत्यंत गंभीर बाब म्हणजे या रस्त्यालगचे फूटपाथ सुद्धा पादचाऱयांसाठी मोकळे ठेवण्यात येत नाहीत. तेथेही दुचाकी पार्क करण्यात येत आहेत, आणि वाहतूक पोलीस हे सर्व प्रकार सहजतेने घेत त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. राजधानीतील या वाहतूक कोंडीत भर घालण्यात पर्यटक टॅक्सींचे मोठे योगदान मिळत आहे. अशा शेकडो टॅक्सी शहरभर बेकायदेशीरपणे उभ्या करून ठेवलेल्या दिसून येतात. कायद्यानुसार या टॅक्सी एक करत त्यांच्या निर्धारित स्टँडवरच ठेवल्या पाहिजेत किंवा मालकाने त्या स्वतःच्या घरी ठेवल्या पाहिजेत, असे रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.
पुन्हा पुन्हा न्यायालयात जाण्यास
भाग पाडू नका ः आयरीश
प्रत्यक्षात सर्व कॅसिनो वाहने पणजी बसस्थानकाशेजारी असलेल्या बहुमजली कार पार्किंग इमारतीतच ठेवण्याची सक्ती गेल्या वषी सरकारने जाहीर केली होती. परंतु विद्यमान सरकारात कुणाला कुणाची भीतीच राहिलेली नाही. वाहतूक पोलीस तर अस्तित्वशून्य बनले आहेत, याकडे ऍड. रॉड्रिग्स यांनी लक्ष वेधले आहे. ही भयावह स्थिती वाहतूक पोलीस आणि वाहतूक अधिकाऱयांनी एकत्र येऊन या परिस्थितीवर उपाययोजना आखली पाहिजे. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांना रात्रपाळीचीही शिफ्ट सुरू करावी ज्यायोगे नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई करणे शक्य होईल. त्याचबरोबर अशा सामान्य प्रश्नांसाठी आपणासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पुन्हा पुन्हा दरवाजे ठोठावण्याची गरज पडणार नाही याचीही दखल घ्यावी, असेही ऍड. रॉड्रिग्स यांनी सूचविले आहे.