ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो, पदयात्रा आणि वाहन रॅलींवर 11 फेब्रुवारीपर्यंत घालण्यात आलेली बंदी निवडणूक आयोगाने कायम ठेवली आहे. मात्र, सभांसाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने खुल्या मैदानात होणाऱ्या सभांना 30 टक्के क्षमतेने तर बंद सभागृहातील सभांना 50 टक्के क्षमतेने सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी 20 जणांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आलेली आहे. तसेच रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत प्रचारावर बंदी असणार आहे.
आयोजक आणि संबंधित राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य आहे. कोविड संबंधित प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास आयोजक जबाबदार असतील, असे निवडणूक आयोगाने आपल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.









