नुवेतील घटनेवर आपची प्रतिक्रिया
प्रतिनिधी /पणजी
शांतीच्या मार्गाने आम्ही केलेल्या आंदोलनाला नुवेचे आमदार बाबाशान डिसा यांनीच चिथविले आणि आता लोकांची सहानुभूती आपला मिळत असल्याचे पाहून उलट आमच्यावरच दोषारोप करत आहेत, असी टीका आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक आणि वेन्झी व्हिएगस यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदाराच्या घराबाहेर झालेला हिंसाचार हा भाजपच्या राजकीय नैराश्याचाच थेट परिणाम असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. काही झाले तरी अन्य पक्षांप्रमाणे आप हा बागवणारा पक्ष नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला.
13 आमदारांनी जनतेशी विश्वासघात करून सत्तेत आल्याचा दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आपने अनोख्या मार्गाने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी प्रत्येक आमदाराच्या घरी जाऊन केक देण्यास सुरू केले होते. काही आमदारांनी खेळीमेळीच्या वातावरणात ते केक स्वीकारले तर काहींनी ते नाकारले. केवळ डिसा यांच्या कार्यकर्त्यांनी या भेटीला हिंसाचाराचे वळण दिले. अगदी आपच्या महिला नेत्यांवर देखील त्यांनी हल्ला केला, असे व्हिएगस म्हणाले.
तरीही दुसऱया दिवशी जेव्हा आपने आमदाराकडून माफीची मागणी करण्यासाठी पुन्हा त्यांच्या घरी जाऊन शांततापूर्ण निषेध व्यक्त केला, तेव्हाही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हिंसक वृत्ती दाखवताना आदल्याच दिवसाची पुनरावृत्ती केली, हिन भाषा वापरली, अंडी-टॉमेटो फेकले, असे व्हिएगश म्हणाले.
आपच्या आंदोलनाला हिंसा संबोधणारे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी डिसा यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे हे हास्यास्पद आहे, कारण डिसा हे स्वतःला अपक्ष आमदार संबोधतात याची जाणीव सावईकर यांना आहे का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
’हिंसाचार ही आमची संस्कृती नाही’, असे भाजपने म्हटले असले तरीही नुवेत हिंसाचार त्यांनीच केला, गुंडांचाही वापर केला. राजकारण्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबावर हल्ला करणारा भाजपच असल्याचाही दावा नाईक यांनी केला.
दरम्यान, भ्रष्टाचारी सरकार स्थापन करण्यासाठी जनतेसोबत केलेल्या विश्वासघातासाठी, कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचारामुळे शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. लोकांना वारंवार रस्त्यावर यावे लागले, अशा भ्रष्टाचारी भाजप सरकारला आम्ही वेळोवेळी उघडे पाडत राहणार आहोत. भाजपने कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही, प्रसंगी तुरुंगवासही भोगण्याची तयारी असेल, असेही एका प्रश्नावर नाईक यांनी सांगितले.









