प्रतिनिधी / कोल्हापूर:
कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रणासाठी राज्य सरकारने राज्यात व जिह्यात लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्य खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 या वेळेत घराबाहेर पडण्याची मुभा दिली आहे. परंतु त्यांना पोलीसांकडून अडवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, जिह्यात राजकीय नेते आपल्या गाडीतून कार्यकर्ते घेऊन बिनधास्त फिरत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या राजकीय नेत्यांना लॉकडाऊन नाही काय? अशी विचारणा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरि कृती समितीतर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन गुरुवारी मेलद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, पोलीस प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना एक व राजकीय नेत्यांना एक न्याय दिला जात असल्याचे दिसत आहे. लोकशाहीत सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अन्यायकारक आहे. पोलिस प्रशासनाने मागील दोन-तीन दिवसांमध्ये काही वयोवृद्ध लोकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये सामान्य नागरिकांच्या वर कारवाई होऊ नये. त्याच बरोबर गेल्या पंधरा दिवसांमध्ये किती राजकीय नेत्यांच्यावर पोलिस प्रशासनाने कारवाई केली याचाही खुलासा व्हावा. जिल्हाप्रशासनाकडून जनहिताचेच काम सुरु आहे, याची आम्हाला जाणीव आहे. सर्वांना समान न्याय अपेक्षित असताना फक्त सर्वसामान्य नागरिकांवरच अन्याय होत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन लोक रस्त्यावर उतरु शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची काळजी घ्यावी ही विनंती.
हे निवेदन निमंत्रक रमेश मोरे, अशोक पोवार, पै. दिनानाथ सिंह, पै. विष्णू जोशीलकर, भाऊ घोडके, राजवर्धन यादव, कादर मलबारी, ऍड रणजीत गावडे, दादा लाड, चंद्रकांत पाटील, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, लहुजी शिंदे, महेश जाधव आदींनी सादर केले.









