राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी तरुणाईला मार्गदर्शन केले आहे. यादरम्यान त्यांनी तरुण-तरुणींना काही लक्ष्ये निश्चित करून दिली, जबाबदारीची आठवण करून देत राजकारणात सामील होण्याची सूचना केली आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाला संबोधित करताना मोदींनी राजकीय घराणेशाही हाच देशाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे विधान केले आहे. राजकीय घराणेशाहीला मूळापासून उखडून टाकावे लागणार आहे. हे काम तरुण-तरुणींनाच करावे लागेल. आडनावाच्या मदतीने निवडणूक लढविणाऱयांचे दिवस कधीच संपले आहेत, असे मोदी म्हणाले.
राजकारणात घराणेशाहीचा रोग पूर्णपणे संपलेला नाही. अद्याप काही लोक पूर्ण शक्तिनिशी स्वतःच्या कुटुंबालाच मजबूत करू पाहत आहेत. घराणेशाहीतून पुढे आलेल्या लोकांचा कायद्यावर विश्वास नसतो आणि कायद्याची भीती देखील नसते. सर्वसामान्य तरुणाई राजकारणात न आल्यास घराणेशाहीचे हे विष लोकशाहीला दुर्बल करत राहणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
तरुणाईने भाग्यविधाता व्हावे
हे तरुणाईचे शतक असल्याचे विवेकानंद म्हणायचे. तरुणाईने पुढे येऊन देशाचे भाग्यविधाता व्हावे. भारताचे भविष्य निर्धारित करण्याची जबाबदारी तरुणाईची आहे. राजकारण देशाला पुढे नेण्याचे सामर्थ्यशाली माध्यम आहे. राजकारणात तरुणाईची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
प्रतिभेला वाव देणार
प्रतिभेनुसार तरुण-तरुणींना स्वतःला विकसित करता येईल अशाप्रकारची व्यवस्था निर्माण केली जात आहे. स्वामी विवेकानंद हे शारीरिक तसेच मानसिक शक्तीवरही भर द्यायचे. फिट इंडिया, योग आणि क्रीडाक्षेत्राशी संबंधित कार्यक्रम युवा सहकाऱयांना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा मजबूत करत आहेत. व्यक्तिमत्व विकासाचा त्यांचा मंत्र होता, जुन्या धर्मांनुसार ईश्वरावर विश्वास न ठेवणारा नास्तिक आहे. तर नवा धर्म स्वतःवर विश्वास न ठेवणाऱया व्यक्तीला नास्तिक मानत असल्याचे विवेकानंद सांगायचे असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
आत्मनिर्भर होण्याची जबाबदारी
देशाला आत्मनिर्भर करण्याचे काम तरुण-तरुणींनाच करावे लागणर आहे. आता आमचे इतके वय नसल्याचा विचार येऊ शकतो. परंतु लक्ष्य स्पष्ट असल्यास वय महत्त्वाचे ठरत नाही. खुदीराम बोस फासावर गेले, तेव्हा त्यांचे वय केवळ 17-18 वर्षे होते. भगत सिंग फासावर गेले तेव्हा ते 24 वर्षांचे होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगण्याचा आणि मरण्याचा निर्धार त्यांनी केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरण पत्करण्याची संधी आम्हाला मिळालेली नाही. आम्हाला स्वतंत्र भारताला पुढे नेण्याची संधी मिळाली असून ती गमावू नये असे मोदींनी म्हटले आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर निवडण्यात आलेले 84 उमेदवार या कार्यक्रमात सामील झाले.









