मगो नेते सुदिन ढवळीकर यांचे गोमंतकीयांना आवाहन
वार्ताहर/ मडकई
गोव्यातील जनतेला भाजपच्या बजबजपूरीतून मुक्त करण्यासाठी राजकीय क्रांतीची आवश्यकता आहे. ज्या मगो पक्षाने गोव्याच्या मुक्तीनंतर गोव्याच्या विकासाचा पाया रचला व सर्वांगिण विकासाची दारे खुली केली. त्याच मगो पक्षाला पुन्हा एकदा नवीन क्रांती करण्यासाठी गोव्यातील तमाम युवकांनी संधी द्यावी. मगो व तृणमूल काँग्रेसची युतीच गोव्यात परिवर्तन घडवून आणेल. परिवर्तनासाठी मगो तृणमूल सत्तेवर आणण्याचे आवाहन मगो ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी केले.
नैसर्गिक आपत्तीतून बागायतदार व शेतकऱयांची झालेली नुकसानीची भरपाई भाजपा सरकार अद्यापपर्यंत नुकसानग्रस्ताना देऊ शकले नाही. विधानसभेच्या या निवडणुकीत मते मागण्यासाठी जनतेच्या दारात भाजपा कोणत्या हक्काने जाईल. कोरोनाच्या महामारीत रस्त्याच्या बाजूला बसून फळ, भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱया तसेच टॅक्सी व मोटार सायकल चालक, मंदिरासमोर बसून फुले विकणाऱया या सर्व गरिब घटकांसाठी सरकारने काय केल्याचा प्रश्न जनताच त्यांना करेल. ऑनलाईन शिक्षण सुरू करताना ग्रामीण भागात टॉवर उभारले नाहीत. विद्यार्थीवर्गाला मोबाईल दिले नाही. याचा जाब भाजपाला मते मागताना पालकांना द्यावा लागेल. नैतीक मुल्यांची पायमल्ली करणाऱया भाजपचे कार्यकर्तेच दुखावलेले आहे. सत्तेसाठी गोव्याच्या राजकारणाची व्याख्याच बदलू पाहणाऱया भाजपला मतदारच बाहेरचा रस्ता दाखवेल असे मगो नेते श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
गेव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी स्वतःच्या आमदारकीचा त्याग करणारे स्व. वसंतराव वेलिंगकर कुठे आणि सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात माकड उडय़ा घेण्यासाठी आमदारांना प्रवृत्त करणारे भाजप कुठे याची तुलना मतदारराजा निश्चीतच करतील. त्यागी वृत्ती व संस्कृती अभिमानी असलेल्या मगो पक्षाचा नेता असल्याचे स्वाभिमानाने सांगत आलेलो असल्याचे मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. मडकई मतदारसंघाने 1999 साली आमदार म्हणून निवडून देताना अलोट प्रेम दिले. त्यांच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकणार नाही.
विधानसभेच्या पाच निवडणुका मडकई मतदारसंघातून लढविल्या. पहिल्या दोन निवडणुका सोडल्यास राहिलेल्या तिन निवडणुकीत मतदारांच्या दाराशी, कोपरा बैठका अथवा जाहीर सभा न घेता विक्रमी मताधिक्क्यांनी विजयी झालो. हा जनतेचा व मगो पक्षाचा विजय आहे. केवळ कार्यकर्ते, मतदार व आपले ज्येष्ठ बंधू प्रा. स्व. मोहन ढवळीकर यांनीच मडकईत आपला प्रचार केला. आपले कुणाशीही वैरत्व नाही. म्हणून एवढे प्रेम जनतेकडून मिळालेले आहे. राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी व गोव्याच्या इतर मतदारसंघात मगो व तृणमूल युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरीता मतदार व कार्यकर्त्यांनी एकसंघ आणि एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्त्यांसोबत आपले बंधू निवृत्त अधीक्षक अभियंते दिलीप ढवळीकर, पूत्र मिथील ढवळीकर प्रचारासाठी असतीलच असे मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.









