सरन्यायाधीश रामण्णा यांचा राजकीय पक्षांना ‘चिमटा’ ः न्यायव्यवस्थेबाबत अमेरिकेत मांडले विचार
कॅलिफोर्निया / वृत्तसंस्था
भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी लोकशाहीतील न्यायपालिकेच्या भूमिकेवर मोठे वक्तव्य केले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को – कॅलिफोर्निया येथे असोसिएशन ऑफ इंडो-अमेरिकन्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय पक्षांच्या न्यायव्यवस्थेतील अपेक्षांबाबत भाष्य केले. प्रत्येक सरकारी कृती ही न्यायिक समर्थनास पात्र आहे, अशी अपेक्षा भारतातील सत्ताधारी पक्षांना असते. तर, विरोधी पक्षांनादेखील न्यायपालिकेने त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेण्याची अपेक्षा असते असे ते म्हणाले. तथापि, न्यायव्यवस्था ही घटना आणि संविधानाला उत्तरदायी असल्याचे त्यांनी याप्रसंगी प्रामुख्याने अधोरेखित केले.
न्यायव्यवस्थेने राजकीय अजेंडा पुढे नेला पाहिजे असा गैरसमज देशातील राजकीय पक्षांमध्ये आहे, असा ‘चिमटा’ सरन्यायाधीशांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना उद्देशून काढला आहे. भारत यावषी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहोत. आपल्याला प्रजासत्ताक होऊन 72 वर्षे होत असताना, मला खेदाने सांगावे लागेल की प्रत्येक संस्था राज्यघटनेने नेमून दिलेल्या भूमिका आणि जबाबदाऱयांचे पूर्ण पालन करायला शिकलेली नाही. सत्तेत असलेल्या पक्षाचा असा गैरसमज आहे की, सरकारचे प्रत्येक काम न्यायालयीन समर्थनास पात्र आहे असे सांगत सरन्यायाधीशांनी राजकीय पक्षांना टोला लगावला आहे.
न्यायपालिका संविधानाला उत्तरदायी
संविधान आणि लोकशाहीच्या आकलनाच्या अभावामुळे वेगवेगळय़ा विचारधारा उद्भवतात. मात्र, केवळ न्यायपालिका संविधानाला उत्तरदायी आहे, यावर त्यांनी भर दिला. भारतातील संवैधानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच राज्यघटनेने प्रत्येक संस्थेला नेमून दिलेल्या भूमिकेची पूर्ण कदर करायला देश अजूनही शिकलेला नाही, असेही ते पुढे म्हणाले. शनिवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्सने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
संविधानात नमूद केलेले नियंत्रण आणि समतोल अंमलात आणण्यासाठी आपल्याला भारतातील घटनात्मक संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. व्यक्ती आणि संस्थांच्या भूमिका आणि जबाबदाऱयांबद्दल जागरूकता पसरवण्याची गरज आहे. लोकशाहीत सर्वांचा सहभाग आहे असे नमूद करतानाच त्यांनी काही देशांचे दाखलेही दिले.
भारतीय समुदायाच्या कामगिरीचे कौतुकही सरन्यायाधीशांनी केले. अमेरिकन समाजाचा सहिष्णु आणि सर्वसमावेशक स्वभाव जगभरातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा आकर्षित करू शकल्यामुळे त्याच्या वाढीस हातभार लागला आहे, असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांचा व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विविध पार्श्वभूमीतील पात्र प्रतिभांचा सन्मान करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.









