प्रतिनिधी/ सातारा
आज समाजातील अनेक नवयुवकांना राजकारणात उतरण्याची इच्छा आहे. त्यांना समाजासाठी काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे. अशा नव-तरुणांना युवक कॉंग्रेस आगामी काळात संधी देणार आहे, अशी घोषणा सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी आज जिल्हा कॉंग्रेस कमिटीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आढावा बैठकीत केली.
राज्यातील युवक काँग्रेसचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अंतर्गत जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हा कॉंग्रेस कमिटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रतिनिधी गौरव श्रीमलिजी, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शंभूराजे देसाई, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव दादासाहेब काळे, जिल्हा युवक कॉंगेस उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष अजित भोसले, सातारा-जावली विधानसभा अध्यक्ष विक्रांतसिह चव्हाण, कराड दक्षिण विधानसभा अध्यक्ष वैभव थोरात, कराड विधानसभा अध्यक्ष आमित जाधव, वाई विधानसभा अध्यक्ष विशाल डेरे, ऋषिकेश ताटे, विशाल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विराज शिंदे म्हणाले, आगामी काळात जिल्हाच्या राजकारणात येऊ इच्छिणाऱया तरुणांचे युवक कॉंग्रेस मध्ये स्वागत आहे. राजकारणात काम करण्याची आणि मोठ होण्याची इच्छा ज्या तरुणांना आहे. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम युवक कॉंग्रेस आगामी काळात करणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील तरुणांची भेट घेऊन तिथे त्यांची निवड करण्यात येणार आहे. युवक कॉंग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी पक्षातर्फे ‘युवा जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात चालणाऱया या अभियानाअंतर्गत जिह्यात 50 हजार युवकांना जोडण्याचा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.









