अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबद्दल प्रचारकाळात अश्लाघ्य स्वरूपाचे उद्गार काढले होते. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक समर्थकांनी कमला यांच्यावर वांशिक शेरेबाजी तर केलीच. पण त्या एक महिला आहेत हेही न बघता, त्यांची निंदानालस्ती केली. स्त्रियांबाबत पूर्वग्रहदूषित आणि असभ्य भाषेतली शेरेबाजी ही तशी जगात अनेक ठिकाणी चालते. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाने गेल्या जानेवारीत एक अभ्यास अहवाल तयार केला होता. त्यानुसार, देशातील 95 राजकारणी महिलांसंदर्भात ट्विटरवरून दहा लाखवेळा हेटाळणीपूर्ण उल्लेख केला गेल्याचे दिसून येते. गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी जवळपास शंभर महिला उमेदवारांना सोशल मीडियावरून करण्यात आलेल्या हेटाळणीचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या निमंत्रक हसिबा अमीन यांनी सांगितले की, 2014 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हापासून चारित्र्यावर चिखलफेक करणे, बलात्काराच्या धमक्मया देणे, असे अनुभव मला आले आहेत. भाजपच्या नेत्या (पूर्वी त्या ‘आप’ मध्ये होत्या) शाजिया इल्मी यांनी सांगितले की, राजकरणात प्रवेश करण्याची फार मोठी किंमत मला मोजावी लागत आहे. व्यक्तिगत जीवनाविषयी शेरेबाजी करणे, ऑनलाईन छळवणूक करणे याचा अनुभव आल्याची माहिती शाजिया यांनी दिल्याचे या अहवालात म्हटले आहे. बसपच्या अध्यक्ष मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका उत्तर प्रदेशमधील भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकरसिंग यांनी केली होता. त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि त्यांची पदावरून हकालपट्टीही झाली होती. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाजपच्या वतीने दिलगिरीही व्यक्त केली होती.
अमेरिका आणि भारतातच हे घडत असेल, तर पाकिस्तानची अवस्था काय असेल? 2011 साली हीना रब्बानी खार या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्याबरोबर वाटाघाटी करण्यासाठी त्या भारतभेटीवर आल्या होत्या. तेव्हा ‘फॅशन आयकॉन’ अशा पद्धतीने त्यांचे वर्णन भारतीय माध्यमांतून होत होते आणि खुद्द हीना यांना ही गोष्ट रुचली नव्हती. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुत्तो आणि हीना यांचे प्रेमसंबंध असल्याची बातमी बांगलादेशातील एका ऑनलाईन मासिकाने छापली होती. त्यानंतर ही बातमी छापणाऱया मासिकाच्या संपादकाला अटकही करण्यात आली होती. परंतु हीना यांना याप्रकारचे अनुभव पाकिस्तानमध्येही आलेच. पीपीपीच्या प्रमुख आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांनादेखील कट्टरपंथीयांचे निर्बंध आणि शिव्याशाप या अनुभवातून जावे लागले. आता पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रदान नवाज शरीफ यांच्या कन्या मरयम नवाज यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मला ‘नया पाकिस्तान’ घडवायचा आहे, अशी घोषणा करून, ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) प्रमुख इमरान खान हे पंतप्रधानपदी जाऊन बसले. खुद्द इमरान हे आपल्या चंगळवादी आणि स्वैर जगण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. इमरान खान अलीकडेच म्हणाले की, मरयम या पाक लष्करावर टीका करून मोकळय़ा होतात. पाकिस्तानात आम्ही महिलांना सन्मान देतो. पीटीआयच्या ट्विटर फॉलोअरने, ‘औरत कार्ड वापरू नका’ अशी टिप्पणी मरयमला उद्देशून केली आहे. स्त्रियांच्या सन्मानाची गोष्ट करणाऱया इमरान यांनी तर मरयमला ‘नानी’ असे संबोधले आहे. मरयम यांची ‘खूबसूरती’ ही प्लॅस्टिक सर्जरीची किमया आहे आणि त्यांच्यावरील या शल्यक्रिया करदात्यांच्या पैशातून झाल्या आहेत, असे उद्गार काश्मीर व गिलगिट बाल्टिस्तानविषयक खात्याचे मंत्री अली अमीन गंदापूर यांनी काढले आहेत. हे उद्गार त्यांनी एका जाहीर सभेत काढले. पीटीआय पक्षातील एकाही नेत्यास यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. अली अमीन यांनी माफी मागावी अशी मागणी करावी, असे पक्षातील कोणालाही वाटले नाही. उलट मरयम यांना उद्देशून अली अमीन यांनी ‘माल’ असा शब्द वापरला व त्याचा निषेध करावा, असे कोणाच्या मनातही आले नाही.
आपल्याकडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्यंतरी पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत भाजप उमेदवार इमरतीदेवी यांना उद्देशून ‘आयटम’ असा शब्द वापरला होता. त्याबद्दल केवळ भाजपनेच नव्हे, तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही टीका केली होती. अली अमीन यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ब्लॅक लेबल व्हिस्कीच्या बाटल्यांसह एकदा पकडण्यात आले होतं, तेव्हा ‘हा मध आहे, दारू नव्हे’ अशी सारवासारव त्यांनी केली होती. अशा व्यक्तीने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या कन्येवर वाईटसाईट टिप्पणी करावी, हे आक्षेपार्ह आहे. आपल्याकडेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही त्यांचे कपडे व राहणी या अनुषंगाने हीन स्वरूपाच्या कॉमेंट्स केल्या जातात. मरयम यांचा मेकअप, त्यांच्या बॅग्ज, पादत्राणे यावरूनही टीकाटिप्पणी केली जात असते. मरयम या पूर्वी धर्मादाय कार्य करत असत. मात्र 2012 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2013 सालच्या संसदीय निवडणुकीत पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली. पिता पंतप्रधान असताना, युवक कार्यक्रम विभागाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. मरयम यांचे पती सफदर अवान हे पाकिस्तानी लष्करात कॅप्टन होते. पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सुरक्षा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. मरयम यांनी साहित्यात एम. ए. केले असून, 9-11 नंतर पाकिस्तानात वाढलेला कट्टरतावाद या विषयावर त्या पीएच.डी.ही करत होत्या. पुढे त्यांच्या पीएच.डी. डिग्रीबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले.
पाकिस्तान हा अजूनही सरंजामशाही आणि पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. पाकिस्तानात भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पूर्णतः राजकियीकरण झाले आहे. मरयम नवाज भ्रष्ट असतील वा नसतीलही. परंतु त्यांच्यावर गलिच्छ शेरेबाजी करणारेही स्वच्छतेचे पुतळे नव्हेत. म्हणूनच 1990 च्या दशकात शेख रशीद या एका संसद सदस्याने पिवळय़ा पोशाखात आलेल्या बेनजीर यांना उद्देशून ‘पीली टॅक्सी’ हा शब्द वापरला होता. आज हेच रशीद पीटीआय पक्षाशी संबंध ठेवून आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे माहिती मंत्री फरिदौस अवान यांनी एका महिला आमदाराबाबत, ती वेश्यागृहातून राजकारणात आल्याचे म्हटले होते. पीएमएल-एनच्या प्रमुख नेत्यांनीदेखील आपल्या विरोधकांवर सेक्सिस्ट अशी शेरेबाजी केली आहे. जागतिकीकरण येऊन 25 वर्षं लोटली. उंबरठय़ाबाहेर पडणाऱया स्त्रियांची संख्याही उंबरठय़ा आतील स्त्रियांपेक्षा अधिक झाली. कॉर्पोरेट क्षेत्रात स्त्रीपुरुष मित्रमैत्रिणींप्रमाणे समानतेचा व सलोख्याचा व्यवहार करत असल्याची दृश्ये बऱयाच ठिकाणी बघायला मिळतात. परंतु ज्या राजकीय नेत्यांनी समाजाचे नेतृत्व करायचे, त्यांनीच हीन व मध्ययुगीन मानसिकता ठेवली, तर समाजाचे काय होणार, असा प्रश्न पडतो.
नंदिनी आत्मसिद्ध








