चारजण एकत्र वावरत असताना एखाद्याचे वागणे दुसऱयाला नापसंत पडू शकते. ज्याला नापसंत आहे त्याची औकात असेल तर तो समोरच्याला रागावू शकतो किंवा माफ करू शकतो. सहसा माणसे राग व्यक्त करून मोकळी होतात. पण या रागावण्याचे नंतर काय परिणाम होत असतील.
राग आल्यावर आपण चटकन ज्यांना रागावू शकतो ते म्हणजे पाळीव प्राणी. अनेकांच्या घरात मांजर किंवा कुत्रा पाळलेला असतो. माणसे कधी बाहेरून चिडून येतात. कधी कुत्र्याने कोणाची खोडी काढलेली असते. कधी मांजराने दुधाचे पातेले सांडलेले असते. अशावेळी रागाच्या भरात त्या प्राण्याला एखादा फटका बसतो. तो प्राणी केविलवाणे डोळे करून घरातल्या घरातच लांब जाऊन बसतो. पण राग शांत झाल्यावर पाचदहा मिनिटांनी त्या प्राण्याला जवळ बोलावून पहा. तो देखील ते रागावणे-मार खाणे विसरून जवळ येतो.
एखाद्या चुकीबद्दल रागावले किंवा मारले तर लहान मुले रडतात. पण थोडय़ा वेळाने ती शिक्षा विसरून जातात. त्याबद्दल मनात आकस ठेवत नाहीत. आईने रागावल्यावर रडणारे मूल अनेकदा तिच्याच कुशीत झोपून जाते.
काही प्रकार मात्र विसरता न येणारे असतात. एका कचेरीत अशी व्यवस्था होती की लेखनिक-शिपाईपदाच्या कर्मचाऱयांना त्यांच्या युनियनचे संरक्षण होते. त्यामुळे ते कोणाला भीत नसत. मात्र ऑफिसर्सना युनियन नव्हती. ते बिचारे युनियनला आणि आपल्या वरि÷ांना अशा दोघांना भ्यायचे. अशाच एका कचेरीत संध्याकाळी घरी जायच्या वेळेस एक ऑफिसरला भेटायला त्याची बायको आली होती. तिच्या देखत वरि÷ांनी त्याचा प्रचंड अपमान केला. तो वरि÷ांना उलट बोलू शकला नाही. पण नंतर रक्तदाब वाढून आजारी पडला. अपमान कधीच विसरला नाही. निवृत्तीनंतर त्याने त्याच वरि÷ांना शिवीगाळ करून स्वतःचे मन शांत केले.
दुसरा प्रकार खूपच केविलवाणा आहे. एकत्र कुटुंबात लहान मुलांदेखत त्यांच्या आईला किंवा वडिलांना कोणी काही बोलले तर मुले दुखावतात. सहसा हे अपमान मुले कधीच विसरत नाहीत.
शेवटचा प्रकार सांगून थांबतो. हिंदी चित्रपटसृष्टीतला विजय आनंद हा दिग्दर्शक आणि राहुल देव बर्मन माझे खूप आवडते. एका अभिनेत्याने चित्रणाच्या वेळी त्यांना खूप त्रास दिल्याचे, अपमानास्पद वागणूक दिल्याचे वाचले आणि तो अभिनेता माझ्या मनातून कायमचा उतरला.








