प्रतिनिधी / कुर्डुवाडी
गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसलेल्या एस.टी महिला कामगारांनी राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना राखी सोबत निवेदन पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सुचवले आहे.आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे चाक कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक गर्तेत अडकत चाललेले आहे.
फक्त जिल्हांतर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत फक्त बावीस प्रवाशांची वाहतूक यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबले आहे. त्याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यापासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न समोर उभा ठाकलेला आहे.
या आर्थिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी व कामगारांचे वेतन त्वरित अदा करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या महिला कामगार सदस्यांनी राखी पौर्णिमाच्या भाऊ – बहिणीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व निर्भया सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवून कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे.
राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांचे अभियाना अंतर्गत प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख या राखी व निवेदन पाठवणार आहेत अशी माहिती सोलापूर जिल्हा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना विभागीय महिला अध्यक्ष सविता चव्हाण,विद्या माने,उमा काळे, विजया भूमकर,सुषमा गायकवाड व त्यांच्या सर्व सहकारी निर्भया भगिनी यांनी दिली.
Previous Articleरत्नागिरी : युवा सेनेकडून दापोली येथील कोविड सेंटरचा पर्दाफाश
Next Article कलाकार करत आहेत स्वत:चाच मेकअप








