वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीआयचे माजी अधिकारी राकेश अस्थाना यांची नियुक्ती दिल्लीचे पोलीस कमिशनर म्हणून केल्याबद्दल एका बिगर सरकारी संस्थेने दाखल केलेल्या अपील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे. अस्थाना यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयाने उचलून धरली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अस्थाना यांची बाजू मुकूल रोहटगी मांडत आहेत. तर बिगर सरकारी संस्थेच्यावतीने प्रशांत भूषण काम पाहत आहेत. केंद्र सरकार या प्रकरणी दोन आठवडय़ात प्रतिज्ञापत्र सादर करेल, असे मेहता यांनी स्पष्ट केले.









