वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत फुटाने वाढ झाली. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास आता केवळ तीन फूट पाण्याची आवश्यकता आहे. पावसाने असाच जोर ठेवल्यास जलाशयातील पाणी (सहा दरवाजातून) सोडण्याची तयारी जलाशय व्यवस्थापनाने ठेवली आहे.
जलाशय परिसरात बुधवारी सकाळी 23.4 मि. मी. पावसाची नोंद झाली. या वर्षी एकूण 957 मि. मी. पाऊस झाला आहे. तर 2473 फूट पाणीपातळीची नोंद झाली आहे. जलाशय ओव्हरफ्लोसाठीची पाणी पातळी 2478 फूट इतकी आहे. मात्र मागील वर्षी तुडये येथील शेतकऱयांनी एकत्र येत वाढीव पाणी पातळी 2475 फुटापर्यंत ठेवली होती. त्यामुळे काठावरील शेतकऱयांचे होणारे पिकांचे नुकसान टळले होते.
23-9-2020 रोजी 2476.10 फूट पाणी पातळी झाल्यानंतर शेतकऱयांनी 2475 फूट पाणी पातळी राखत आपला दणका पाणी पुरवठा मंडळाला दिला होता. आता यावर्षीही पाणी पातळी 2475.80 फुटापर्यंत ठेवावी लागणार आहे.









