वार्ताहर / हुपरी
रांगोळी ता. हातकणंगले येथे लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा शिथिलता मिळाल्यानंतर देशी, गावठी दारूचे दुकान व इतर अवैध धंदे दोन महिने बंद करावेत अशा प्रकारचे निवेदन ग्रामस्थानी ग्रामपंचायतीत सरपंच नारायण भोसले यांना दिले आहे. जर या निवेदनाचा विचार वेळीच न केल्यास ग्रामस्थाच्या वतीने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. सध्या देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून ह्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या घटनेस अनुसरून देशातील राज्यातील व इतर सर्व गावातील देशीदारू दुकाने, वाईन्स,बिअर बार परमिट, बिअर शॉपी, गावठी दारूचे दुकाने पूर्णपणे बंद करून इतर अवैध धंदेसुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत.
या दारूच्या व अवैध धंद्याच्या व्यसनाने अनेक कुटूंबे उध्दवस्त झाली आहेत. जे लोक अतोनात व्यसनाच्या आहारी गेले होते त्या लोकांना लॉकडाऊन झाले असल्याने दारू न मिळाल्यामुळे सुखी जगत आहेत. आज काही प्रमाणात लोकांची हे दारू पिण्याचे व्यसन सुटण्याच्या मार्गावर असून यातून काही प्रमाणात अनेक कुटुंबांचे भलं होणार आहे. ठराविक काळानंतर शासन लॉकडाऊन कमी करून पुन्हा एकदा दुकाने चालू करण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे. जर देशी दारू ,गावठी दारूचे दुकाने चालू झाली तर अनेक दिवसापासून अलिप्त असलेले हे लोक पुन्हा त्या व्यसनाकडे आकर्षित होतील, आणि त्यांचे संसार मातीमोल होतील याचा विचार सरपंच व सर्व सदस्यांनी करावा. लॉकडाऊन काळामध्ये अनेकांच्याकडे रोजगार, कामधंदे नसल्यामुळे पैसा उपलब्ध नाही तो पैसा उपलब्ध करण्यासाठी हे मद्यपेय करणारे लोक वेगळ्या मार्गाचा अवलंब करू शकतात यामध्ये गुन्हेगारी वाढण्याचीही शक्यता आहे. तसेच कौटुंबिक, सामाजिक कार्यात अशांतता पसरण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शासनाचा नियम धाब्यावर बसवून हे मद्यपेय करणारे लोक गावात बिनधास्त वावरताना दिसतील त्यावेळी आवरणे कठीण होईल ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने या निवेदनाचा विचार करून लॉकडाऊन काळानुसार आणखी दोन महिने ही दुकाने बंद करावीत आणि ग्रामस्थाच्या भावना जाणून घ्याव्यात. जर या निवेदनाचा विचार केला नाही तर आंदोलन करून वेळ प्रसंगी उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थाच्या वतीने माजी उपसरपंच प्रविणकुमार शेट्टी यांनी दिला आहे. निवेदनावर विजय माने, पिंटू देसाई, आण्णासाहेब गुंडे, यलाप्पा कदम, कुबेर कांबळे, रामचंद्र वजारे, अभिजित कांबळे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.