त्रिवेणी ‘ ग्रुपमुळे रांगण्याला गतवैभव : जिल्हाधिकारी रेखावार
प्रतिनिधी/ सरवडे
सुमारे पावणे दोनशे वर्षे रांगण्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा परिश्रमाने पुन्हा गडावर आणून त्रिवेणी रांगणा ग्रुपने ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचे काम केले आहे. या तोफांसाठी बनविलेले तोफगाडे आणि त्यासाठी बांधलेले चौथरे यांमुळे रांगणा किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले असून, या तरुणांची किल्ल्याप्रती असलेली तळमळ कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले.
बिद्री – बोरवडे येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्याच्या दरीतून बाहेर काढलेल्या तोफांचे पुजन व ग्रुपने बनविलेल्या तोफगाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या तोफा बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले, रांगणा किल्ल्याने मराठी साम्राज्याच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावली होती. कोकणातून पुणे प्रांतात संदेश पोहचवण्यासाठी या गडाचा वापर होत असे. या गडावर आणलेल्या तोफा यापुढे गडाला भेट देणाऱ्या सर्वांना प्रेरणा देत राहतील.
यावेळी त्रिवेणी ग्रुपचे प्रमुख महादेव फराकटे यांनी तोफा व गडाविषयी माहिती दिली. प्रविण पाटील यांनी तोफा बाहेर काढताना आलेले अनुभव व अडचणींविषयी सांगितले तर प्रा. अतुल कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार अश्विनी अडसूळ, वनाधिकारी किशोर आहेर, उद्योगपती बालाजी फराकटे , प्रवीण पाटील, सभापती जयदीप पोवार, सुनील वारके, संभाजी फराकटे, नंदू पाटील, चंद्रकांत वारके यांच्यासह परिसातील आणि बिद्री , बोरवडे येथील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
कोल्हापूरची पोरं सगळ्यात भारी !
कोल्हापूरला रांगड्या मातीचा वारसा लाभला असून इथल्या लोकांनी अशक्यप्राय वाटणारी कामेही मोठ्या प्रयत्नाने यशस्वी करुन दाखवली आहेत. येथील तरुण, तरुणींनी एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत, याची प्रचिती वारंवार आली आहे. त्रिवेणी ग्रुपच्या शिलेदारांनी केलेले काम पाहता हे तरुण हा वारसा पुढे चालवत असल्याचे गौरवोदगार जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले.