वेलिंग्टन : माजी आंतरराष्ट्रीय यष्टिरक्षक ल्युक राँची यांची न्यूझीलंड संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी कसोटीवीर पीटर फुल्टॉन यांनी कँटरबरी या प्रथमश्रेणी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी हे पद सोडले होते.
2017 मध्ये राँची यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून ते राष्ट्रीय संघाला क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षण विभागात मार्गदर्शन करीत आहेत. फुल्टॉन यांनी एक वर्ष काम केल्यानंतर गेल्या जुलैमध्ये फलंदाजी प्रशिक्षकपद सोडले होते. पेग मॅकमिलन यांच्यानंतर त्यांनी या पदाची सूत्रे घेतली होती. दोन आठवडय़ानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध न्यूझीलंडची मालिका सुरू होत असून या नियुक्तीने आपली जबाबदारी वाढली असल्याचे राँची यांनी म्हटले आहे. 39 वर्षीय राँची न्यूझीलंडमध्ये जन्मले. पण लहान असतानाच त्यांचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. राँची यांनी 2008 ते 2009 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2012 मध्ये ते पुन्हा मायदेशात न्यूझीलंडला परतल्यावर पुढल्याच वर्षी त्यांना न्यूझीलंड संघात स्थान मिळाले होते. त्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यातच जास्त भाग घेतला होता. त्यात 2015 विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे. विंडीजविरुद्ध न्यूझीलंडमध्ये 3 टी-20 सामन्यांची मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे.









