मंदिरा बेदी…मनोरंजन क्षेत्रातलं अत्यंत आकर्षक असं हे व्यक्तिमत्त्व. वयाच्या 48 व्या वर्षीही मंदिरा तरुण दिसते. तिने सुडौल बांधा जपला आहे. नियमित व्यायाम आणि पोषक आहार हे तिच्या तंदुरुस्तीचं रहस्य आहे. मंदिरा व्यायाम कधीही चुकवत नाहीत. लॉकडाउनच्या काळात घरी असतानाही तिने तंदुरुस्तीवर भर दिला होता. ती घरीच व्यायाम करत होती.
मंदिरा व्यायाम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने मध्यंतरी इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले होते. ती स्वॉट्स, जम्पिंग जॅक, रिव्हर्स कर्ल, सुपरमॅन, प्लँक असे व्यायामप्रकार करते. दररोज हे व्यायाम केल्यास तुम्ही तंदुरुस्त राहू शकता, असं तिने म्हटलं आहे.
मंदिराचा अर्थातच योगासनांवरही भर आहे. योगा करतानाचे तिचे व्हिडिओही बरेच लोकप्रिय आहेत. ती एका व्हिडिओमध्ये अधोमुख श्वानासन करताना दिसते. अधोमुख श्वानासन हे काहीसं कठीण आसन असून नियमित सरावानेच शारीरिक संतुलन साधणं शक्य होतं. ती चक्रासनही करते. या आसनामुळे त्वचा तजेलदार आणि तरुण दिसू लागते. ती सर्वांगासन आणि हलासनही लीलया करते. सर्वांगासनात पोटावर ताण येत असल्यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच चेहर्यावरील सुरकुत्या, डाग कमी व्हायला मदत होते. म्हणजेच या आसनाने चेहर्यावर वार्ध्यक्याच्या खुणा दिसत नाहीत. म्हणूनच मंदिराचं हे आवडतं आसन आहे. यासोबतच ती अधोमुख वृक्षासन, शीर्षासनासारखी आसनंही करते.









