प्रत्येक खोलीत एक शिवलिंग, तंत्र-मंत्र शिकण्यासाठी यायचे विदेशी
भारताला मंदिरांचा देश म्हटले जाते. येथे अनेक प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे अत्यंत रहस्यमय असून यात मध्यप्रदेशातील चौसष्ठ योगिनी मंदिर देखील सामील आहे. भारतात 4 चौसष्ठ योगिनी मंदिरे आहेत. ओडिशात दोन तर मध्यप्रदेशात दोन मंदिरे आहेत. पण मध्यप्रदेशच्या मुरैना येथील चौसष्ठ योगिनी मंदिर सर्वात प्राचीन आणि रहस्यमय आहे.
भारतातील सर्व चौसष्ठ योगिनी मंदिरांमध्ये हे एकमात्र मंदिर अद्याप चांगल्या अवस्थेत आहे. मुरैनातील ही मंदिर तंत्र-मंत्रासाठी जगभरात ओळखले जात होते. या रहस्यमय मंदिराला तंत्र विद्यापीठ देखील म्हटले जायचे. येथे जगभरातून लाखो तांत्रिक तंत्र-मंत्राची विद्या शिकण्यासाठी येत होते.
मध्यप्रदेशातील प्राचीन चौसष्ठ योगिनी मंदिर गोलाकार असून यात 64 खोल्या आहेत. या सर्व 64 खोल्यांमध्ये भव्य शिवलिंग स्थापित आहे. हे मंदिर मुरैना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मितावली गावातील हे रहस्यमय मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे.
या अद्भूत मंदिराची निर्मिती सुमारे 100 फुटांच्या उंचीवर करण्यात आली असून डोंगरावर स्थित हे गोलाकार मंदिर एखाद्या उडत्या तबकडीप्रमाणे वाटते. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 200 पायऱया चढाव्या लागतात. मंदिरामध्ये एका खुल्या मंडपाची निर्मिती करण्यात आली असून यात एक विशाल शिवलिंग स्थापित आहे. हे मंदिर 700 वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते.
या मंदिराची निर्मिती कच्छप राजा देवपालाने 1323 साली केली होती. या मंदिरात ज्योतिष आणि गणिताचे शिक्षण देण्यात यायचे. हे भगवान शिवाचे मंदिर असल्याने लोक तंत्र-मंत्र शिकण्यासाठी यायचे असे बोलले जाते.

मंदिरातील प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आणि योगिनी देवीची मूर्ती स्थापित असल्याने या मंदिराचे नाव चौसष्ठ योगिनी ठेवण्यात आले. पण अनेक मूर्तींची चोरी झाली आहे. याचमुळे आता उवर्रित मूर्तींना दिल्लीतील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. 101 स्तंभ असलेल्या या मंदिराला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने प्राचीन ऐतिहासिक स्मारक घोषित केले आहे.
संसदनिर्मितीसाठीची प्रेरणा
ब्रिटिश स्थापत्यकार एडविन लुटियन्सने मुरैना येथील चौसष्ठ योगिनी मंदिराच्या आधारावरच भारतीय संसदेची निर्मिती केली होती असे सांगण्यात येत. भारतीय संसदेची वास्तू या मंदिराशी साधर्म्य दर्शविणारी आहे. तसेच याचे खांब देखील मंदिराच्या स्तंभाप्रमाणेच दिसतात. आजही हे मंदिर भगवान शिवाच्या तंत्र साधनेच्या कवचाने झाकलेले असल्याचे स्थानिकांचे मानणे आहे. या मंदिरात कुणालाच रात्रीच्या वेळी थांबण्याची अनुमती नाही.









