कोल्हापूर/ /प्रतिनिधी:
मास्क न लावता मावा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या तरुणावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी विक्रम विद्याधर नांदगावकर (वय ३९, रा. शिवगंगा कॉलणी, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तो मूळ राहणार रत्नागिरी येथील रहिवाशी आहे. रस्त्यावर थुंकल्याने कारवाई ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून कारवाईमुळे व्यसनी लोकांचे धाबे दणाणले आहेत.
हकीकत अशी, फिर्यादी दिपा सुरेश शिपुरकर (४७, रा. मधुबन हौसींग सोसायटी, राजारामपुरी १३ वी गल्ली) या २ मे रोजी सकाळी दहा वाजता असेम्ब्ली रोडने बसंत-बहार टॉकीज समोरुन मोपेडवरुन जात असताना एका दूचाकीवरुन (एम. एच. ०९ बी. टी. ५१८०) वरुन तोंडास मास्क न लावता मावा खाऊन रोडवर थुकत असलेचे फिर्यादी दिपा शिपुरकर यांना दिसले. त्यांनी त्याला महाशय गाडीवरुन जाताना खाकरुन थुंकू नका, तोंडाला मास्क लावा, तुमच्या थुंकण्याने इतरांच्या जिवीतास, आरोग्यास धोका होवू शकतो असे समजावून सांगत असताना दूचाकी चालकाने तुम्हाला काय करायचे, तुमच्या अंगावर पडले का? असे उध्दटपणे प्रतिउत्तर देवून निघून गेला. त्यावेळी दिपा शिपुरकर यांनी त्याचे दूचाकीसह फोटो आपल्या मोबाईलवर घेतला. तो पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना पाठविला. त्यांनी तत्काळ शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक वसंत बाबर यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार बाबर यांनी पोलीस उपनिरीक्षक शाम देवणे, हवालदार दया पाटील, सचिन दुधाणे यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरुन संबधीत दूचाकी चालकाचा शोध घेतला असता तो विक्रम नांदगावकर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला ताब्यात घेवून त्याचे विरुध्द शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फिर्याद दिपा शिपुरकर यांनी दिली आहे.








