कंग्राळी बुद्रुक येथे पर्यावरणप्रेमी-ग्रामस्थांनी दिली समज
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कचरा फेकताना कोठे फेकावा, त्या कचऱयामुळे दुर्गंधी होऊ शकते, याचा विचार कोणीच करत नाही. घरातील कचरा रस्त्यांवर फेकायचा प्रकार सुरू आहे. अशा लोकांना चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न कंग्राळी बुद्रुक येथे करण्यात आला आहे.
कंग्राळी बुद्रुक येथील शाहूनगर परिसरात कचऱयाचे ढीग ठिकठिकाणी पडून होते. यामुळे परिसरातील जनता अक्षरशः वैतागली होती. घरातील कचरा, जुन्या वस्तू रस्त्याशेजारी टाकून द्यायच्या, असा प्रकार सुरू असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे काही पर्यावरणप्रेमी व ग्रा. पं. ने अशा व्यक्तींना टाकलेला कचरा तुम्हीच उचला म्हणून चांगलेच धारेवर धरले. यामुळे रस्त्यावर कचरा टाकणाऱयांना चांगलाच चाप बसला आहे.
आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास मोकाट कुत्र्यांचा हैदोस होतो. यासाठी प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. पहाटे फिरायला जाणाऱया व्यक्तींना त्या परिसरातून जाताना दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल अनेक वेळा ग्रा. पं. मध्ये तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर ग्रा. पं. ने कचरा टाकल्यास 500 रुपये दंड असा फलकही लावला. तरीदेखील अनेकजण कचरा रस्त्यावर टाकत होते. त्यामुळे पर्यावरणपेमी व ग्रा. पं. ने पाळत ठेऊन बुधवारी कचरा टाकणाऱयांना चांगलेच धारेवर धरले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, कलमेश्वर सोसायटीचे संचालक गजानन अष्टेकर, चंद्रकांत अष्टेकर यांनी कचरा टाकणाऱयांना परत कचरा घेऊन जाण्यास भाग पाडले. या कारवाईमुळे ग्रा. पं. व पर्यावरणपेमींचे कौतुक होत आहे.
कचऱयामुळेच कुत्र्यांचा हल्ला
परिसरातील नागरिक कचऱयाबरोबर शिळे अन्न व इतर पदार्थ उघडय़ावर टाकत असतात. यामुळे मोकाट कुत्री व डुकरे त्या ठिकाणी हैदोस घालत असतात. येथून ये-जा करणाऱया नागरिक व जनावरांवर मोकाट कुत्री हल्ला करत असतात. डुकरे या कचऱयात लोळून परिसर दुर्गंधीयुक्त करत आहेत. यामुळे हे सर्व थांबविण्यासाठी नागरिकांनी ग्रा. पं. च्या कचरा गाडीत कचरा टाकावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा.









