दापोलीत सावळजच्या देसाईंचा प्रामाणिक व दानशूरपणा, बक्षीसाचे दहा हजार ही पोलीस स्टेशनला दिले भेट
वार्ताहर / सावळज
दापोली येथे रस्त्यात दीड लाखाहुन अधिक रुपये सापडलेली पिशवी मुळ मालकाला परत करीत जगात आज ही प्रामाणिकपणा ठिकुन असल्याचे तासगाव (जिल्हा सांगली) तालुक्यातील सावळज येथील संदीप बापूसो देसाई यांनी दाखवून दिले आहे. तसेच बक्षीस म्हणून मिळालेले दहा हजार रुपये ही दापोली पोलिस ठाण्याला भेट देऊन देसाई यांनी प्रामाणिकपणासह दानशूरपणा दाखवून दिला आहे. देसाईंच्या या सुसंस्कारी आदर्शवत कार्याने सावळजच्या नावलौकिकात भर पडली असून देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ही देसाईंच्या प्रामाणिकपणाचे व दानशूरपणाचे कौतुक केले आहे.
सावळज येथील संदीप देसाई प्रगतशील द्राक्ष बागायतदार असून ते आपल्या चारचाकी गाडीने दापोलीत आपल्या भावाला भेटण्यासाठी तासगावहुन दापोलीला जात होते. ते खेड भोस्ते घाटात आले असता त्यांना रस्त्याच्या कडेला एक पिशवी पडलेली दिसली. देसाईंनी कुणाचीतरी महत्त्वाची कागदपत्रे पडली असावी असा समज करून पिशवी ताब्यात घेतली पण त्या पिशवीमध्ये काही कागदपत्रे व तब्बल एक लाख साठ हजार रुपयेची रक्कम असल्याचे आढळून आले. या पिशवीतील कागदपत्रावरून खेड लोटे येथील एका कंपनीचे नाव व मोबाईल नंबर मिळाला यावरून संपर्क साधून सदर रक्कमेची तुमची पिशवी सापडली असून दापोली पोलीस स्टेशनला जमा करत असुन पोलीस ठाण्यातुन घेऊन जावे अशी माहिती मूळ मालकाला त्यांनी दिली.
त्यानंतर या कंपनीचे विनोद चाळके यांनी दापोली पोलीस स्टेशनला येऊन पिशवी ओळखली तसेच ही रक्कम कामगाराला वेतन म्हणून देण्यासाठी त्यांचा एक कर्मचारी लोटे गावातुन भरणे गावात दुचाकी वरून जात होता त्यावेळी ही पिशवी भोस्ते घाटात पडली असावी असे त्यांनी सांगितले ही पिशवी दिल्याबद्दल त्यांनी संदीप देसाई यांचे मनापासून आभार मानले. व देसाई यांना बक्षीस म्हणून दहा हजार रुपये रक्कम दिली मात्र देसाईंनी ही बक्षिसाची रक्कम दापोली पोलिस स्टेशनला भेट देऊन दानशूरपणा दाखविला आहे. या आदर्शवत कार्याचे दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, विभागीय पोलीस अधिकारी राठोड, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग यांनी संदीप देसाई यांचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
| बक्षिसाची रक्कम ही पोलीस स्टेशनला भेट रस्त्यात सापडलेली एक लाख साठ हजार रुपयाची मूळ मालकाला परत करून संदीप देसाई यांनी प्रामाणिकपणा दाखवला मात्र या प्रामाणिकपणाबद्दल मूळ मालकाकडून देसाई यांना मिळालेले दहा हजार रुपयाची बक्षिसाची रक्कम त्यांनी दापोली पोलीस स्टेशनला भेट देऊन दानशूरपणाही दाखवला आहे. त्यामुळे देसाई यांचे रत्नागिरी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात कौतुक व अभिनंदन होत आहे. संदीप यांच्या सुसंस्कारी आदर्शवत कार्यामुळे सावळजच्या नावलौकिकात भर पडली आहे. |









